लातुरात साकारला उंबराच्या झाडाचा गणपती; कुतूहल अन आकर्षण, झाडे लावा झाडे जगवा हा संदेश
लातूर:(प्रतिनिधी) वसुंधरा प्रतिष्ठान आणि संस्काररत्न इंग्लिश स्कुल यांच्यातर्फे लातूर शहरातील आदर्श कॉलनी भागात एका उंबराच्या झाडाला चक्क गणपती बाप्पाचे रुप देण्यात आले आहे. रेखीव डोळे, सुपाचे कान, सुंदर फेटा, धोती, कापसाचे हात आदींनी हे झाड गणरायाचे हुबेहूब रुप धारण केले आहे. २०१७ पासून अशा पध्दतीने गणरायाचे रूप झाडात साकारण्यात आले आहे. या पर्यावरण पूरक गणेश उत्सवाची सर्वप्रथम सुरुवात मराठवाड्यात वसुंधरा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने झाली आहे. शिवाय, या गणेश उत्सव काळात प्रतिष्ठान तर्फे 'एक गणेश मंडळ ११ वृक्ष' हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून गणेश मंडळांना मोफत ५ ते ६ फूट उंचीची झाड दिली जात आहेत. याला गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून या गणेश उत्सव काळात वृक्ष चळवळ उभी करण्याचा मानस वसुंधरा प्रतिष्ठानचा आहे.
मी दगडात नाही
मी देवळात नाही
मी झाडात आहे
असा संदेश देणारा हा १०० टक्के पर्यावरण पूरक झाडाचा गणपती बाप्पा सर्वांचे आकर्षक ठरत आहे. कोरोना असल्याने गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
0 Comments