Latest News

6/recent/ticker-posts

दिले फेकून लाजेला... अन लखोपती झाला...!!

युवराज पाटील{जिल्हा माहिती अधिकारी} लातूर यांच्या लेखणीतून...

दिले फेकून लाजेला... अन लखोपती झाला...!!


राठी मुलं उद्योग, व्यवसायात का कमी पडतात...अन एखादी बाजी मारतो...हा अपवाद व्यवसायाचा सिंद्धान्त बनावा असे उदाहरण आज माझ्या पुढ्यात येऊन थांबलं... त्याचं नाव आहे खंडू साळुंखे... अत्यंत हसरा चेहरा, व्यवहार चतुर.. ठासून भरलेली नम्रता...पहिल्या नजरेतचं जिंकून घेणारी निरागसता... ह्या सगळ्या गुणांची बेरीज म्हणजे व्यावसायिक यश आहे...!!

   व्यवसयिक गुणधर्म नसलेल्या, कमाई पेक्षा अनेक वेळा गमाई जास्त असलेल्या, कितीही तोटा झाला तरी काळीशी इमान राखणाऱ्या शेतीशी चिकटून असलेल्याकुणब्याच्या घरात खडूंचा जन्म... पोरानं शिकावं, मोठं व्हावं म्हणून दहावी नंतर सायंस मध्ये शिकविणारे आई - वडील, घरी आठ एकर शेती... पोराला बारावी सायंस मध्ये एका विषयांन दगा दिला... इंजिनियरिंगच्या नोकरी मार्केट मधला एक पोरगा कमी झाला.. खंडूच्या चुलत भावाचा स्थिर झालेला व्यवसाय पण शेतीची चटक लागली आणि दुभती गाय सोडून गावाकडे गेला...!!

बारावी सायंस भले एक विषय गेला तरी बौद्धिक क्षमता विचार करणारी असलेल्या खंडूने चुलत भावाचा व्यवसाय हाती घ्यायचं ठरवून..  आला..!!

व्यावसायिक भांडवल फक्त दोन पातेले, एक गॅस आणि दूध, साखर आणि याचा हात... सुरुवातीला प्रचंड लाजून व्यवसायाला सुरुवात केली... खुप मनात कालवाकालव पण धैर्याने चहाच्या व्यवसायाला सुरुवात केली... सुरुवातीला धडपडला.. पडला, उठला.. गाडीचे गियर टाकत खडे चुकवत पठ्याच्या व्यवसायीक पर्वाच्या गाडीने हम रस्ता पकडला... मागच्या तीन वर्षात त्यात कोविड काळ असूनही 12 लाख रुपये कमविले... गावाकडे दोन एकर शेती घेतली.. आता पैसे बाळगून आहे... रोज पाच हजार रूपयाचे तोंड बघतो... चहाची चव शेकडो लोकांच्या जिभेवर बसल्यामुळे "खंडू चाय " ब्रँड फेमस झालाय.. आज खडूं मला पहिल्यांदा भेटला.. माझा सगळा इतिहास त्याला माहिती होता... यशस्वी व्यवसायिक तोच होतो जो गिऱ्हाईकाची जोडला जातो... असा खंडू शेकडो लोकांशी जोडला गेलाय... अजून लग्न नाही झालं.. लातूर मध्ये प्लॉट घेऊन घर बांधायचे स्वप्न बाळगणारा खंडू त्याचा स्वभाव पाहता  त्याच्या स्वप्नाच्या एकदम टप्यात आहे...!!

काय केलं खंडू ने शेतीचा मोह टाळला, लाज फेकून दिली... व्यवसयिक गणित मांडत न बसता... व्यवसाय रक्तात भिनवून त्याच्याशी प्रामाणिक राहिला... राहतोय आणि पुढेही तो राहिल... ही खंडूची स्टोरी फक्त स्टोरी न राहता  पॅटर्न होऊ शकते... फक्त लाज फेकून देता आली पाहिजे आणि जिद्द आणि चिकाटीचे पंख लागले की अनेक सेवा व्यवसायात खंडू तयार होतील... मला वाटते अशा मिनमिनत्या पणत्या दीपस्तंभ ठरतील म्हणून हा लिहण्याचा प्रपंच...!!


युवराज पाटील{जिल्हा माहिती अधिकारी} लातूर

Post a Comment

0 Comments