महाराष्ट्र स्टेट बॉल बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये लातूर जिल्हा अव्वल
लातूर : दि. 16 – आनंदवन वरोरा (जि. चंद्रपूर) येथे 12 ते 15 सप्टेंबर 2025 दरम्यान पार पडलेल्या 69 व्या महाराष्ट्र स्टेट बॉल बॅडमिंटन चॅम्पियनशिप (मुले-मुली) 2025-26 या राज्यस्तरीय स्पर्धेत लातूर जिल्हा संघाने सुवर्णपदक पटकावत प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेत राज्यातील 30 जिल्ह्यांमधील सुमारे 600 खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
अंतिम सामन्यात लातूर जिल्हा संघाने पुणे महानगर संघावर 2-1 अशा अटीतटीच्या तीन सेटच्या सामन्यात (स्कोअर : 32-35, 35-31, 35-21) विजय मिळवून राज्यात आपले वर्चस्व सिद्ध केले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच लातूर जिल्हा संघाने नागपूर व कल्याण-डोंबिवली संघांवर सरस विजय मिळवत सुवर्णपदकासाठी आपली दावेदारी स्पष्ट केली होती. त्यानंतर कोल्हापूर, संभाजीनगर व हिंगोली जिल्हा संघांवर मात करून लातूरने उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य सामना एकतर्फी जिंकत लातूरने रुबाबात अंतिम फेरी गाठली.
फायनलमध्ये पुणे महानगर संघावर वरचढ होत असताना लातूरच्या अनुभवी राष्ट्रीय बॅक शूटर अकबर पठाण, बेस्ट प्लेयर नईम शेख आणि स्टार ऑफ इंडिया पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू पोलीस उपनिरीक्षक असद शेख यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाला विजय मिळवून दिला. संघाच्या विजयात कर्णधार फैजान शेख, सफल नेट चेकर अदनान शेख, बॅक प्लेअर अर्शद शेख, रितेश घोटमुकले, आमेर शेख, जीशान, रितेश पेटकर यांच्या योगदानाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. प्रशिक्षक सय्यद आयुब सर, मनीषा सूर्यवंशी मॅडम, आयान सर व सय्यद तबरेज सर यांच्या मार्गदर्शनाचा संघाला लाभ झाला.
मुलींच्या संघाचीही दमदार छाप
लातूर मुलींच्या संघात कर्णधार साक्षी रोकडे, रोहिणी सूर्यवंशी, नंदनी सूर्यवंशी, साक्षी इंगळे, सुमती सगरे, देवयानी सूर्यवंशी, तन्वी गायकवाड या खेळाडूंनी उल्लेखनीय कौशल्य दाखवले. विजयी संघाला विजयी चषक आणि प्रमाणपत्र वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आमदार सुधाकर अडबाले, राज्य सचिव अतुल इंगळे, राज्याध्यक्ष पी. के. पटेल, कार्याध्यक्ष डी. एस. गोसावी, कोषाध्यक्ष विजय पळसकर, उपाध्यक्ष रिंकू पापडकर, भारतीय रेल्वे प्रशिक्षक पी. हनुमंता राव, आयोजन सचिव प्रकाश सातपैसे आदींच्या उपस्थितीत खेळाडूंचा गौरव करण्यात आला. लातूर जिल्हा संघाने याआधीही राज्य व राष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धांमध्ये नावलौकिक मिळवला आहे. जिल्ह्यातील अकबर पठाण, चेतन मुंडे, नईम शेख, अदनान शेख, तानाजी कदम, अर्शद शेख, संगमेश्वर लाटे, माधव सोनटक्के आदींसह अनेक राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. मुलींपैकी मनीषा सूर्यवंशी, उज्वला कांबळे, पूजा राठोड, स्वाती औसेकर यांच्यासह अनेकांनी राष्ट्रीय पातळीवर पदके मिळवून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.
या स्पर्धेत लातूरच्या अकबर पठाण (बेस्ट शूटर), नईम शेख (बेस्ट प्लेयर ऑफ महाराष्ट्र) आणि साक्षी रोकडे (राष्ट्रीय निवड) यांची ऑल इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप, तमिळनाडूसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंचा डॉक्टर वैभव रेड्डी, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संगमेश्वर नीला, उपाध्यक्ष ज्ञानोबा भोसले, सहसचिव धनंजय कोत्तापल्ले तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सुवर्णयशाने लातूर जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा राज्यभर आणि राष्ट्रीय स्तरावर मानाने झळकले आहे.





0 Comments