Latest News

6/recent/ticker-posts

लातूरमध्ये राज्यस्तरीय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेला उत्साहपूर्ण प्रारंभ

लातूरमध्ये राज्यस्तरीय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेला उत्साहपूर्ण प्रारंभ


२८ जिल्ह्यांतील ३२० खेळाडूंचा सहभाग; आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार

लातूर :  तायक्वांदो या खेळाची ३५ वी वरिष्ठ गट महिला व पुरुष अजिंक्यपद स्पर्धेचे लातूर शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष ॲड किरण जाधव यांच्या हस्ते उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.  राज्यातून २८ जिल्ह्यातील ३२० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग झाले असून आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रुतीका टकले, शिवम शेट्टी, मृणाली हरणेकर यांचाही या स्पर्धेत सहभाग असून त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

औसा रोड वरील जिल्हा क्रीडा संकुलात तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई यांच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूर यांच्या वतीने या राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे , अशी माहिती जिल्हा संघटनेचे सचिव नेताजी जाधव यांनी दिली आहे. उद्घाटन प्रसंगी ॲड किरण जाधव म्हणाले की, आजच्या युगात मुलं इलेक्ट्रॉनिक माध्यमात गुंतलेली आहेत, त्यांना मैदानावर आणणे आता शक्य होत नाही. त्यामुळे तायक्वांदो सारख्या मार्शल आर्ट खेळाची सवय बालवयापासूनच खेळाडूंना लावणे गरजेचे झाले असून यासाठी आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वात क्रीडाविषयक विशेष पावले उचलावी लागणार आहेत असे मत यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केले आहे. तायक्वांदो या खेळाला आंतरराष्ट्रीय दर्जा असून शासकीय स्तरावर विविध फायदे खेळाडूंना मिळवता येतात. खेळाडूंनी मोठ्या संख्येवर तायक्वांदो या मार्शल आर्ट सारख्या स्व-संरक्षण करता येणाऱ्या खेळाकडे वळले पाहिजे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा तायक्वांदो राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले. यावेळी बोधिसत्व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्यासपीठावर प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या राज्यस्तरीय स्पर्धा दिनांक ५ डिसेंबर रोजी सुरू झाल्या असून त्याचा समारोप रविवारी दिनांक ७ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. याप्रसंगी तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव तथा स्पर्धा निरीक्षक मिलिंद पठारे यांची विशेष उपस्थिती होती तर राज्य संघटनेचे उपाध्यक्ष दुलीचंद मेश्राम, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे व सुभाष पाटील, मुंबई जिल्हा सचिव विजय कांबळे,  कोल्हापूर जिल्हा सचिव कृष्णा जंगम, लातूर काँग्रेस मीडिया सेलचे प्रमुख प्रवीण सूर्यवंशी, लातूर मनपा माजी नगरसेवक गिरीश ब्याळे, धनाजी घाटे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते लाला भिल्लारे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाची प्रस्तावना लातूर तायक्वांदो जिल्हा संघटनेचे सचिव तथा आशियाई तायक्वांदो प्रशिक्षक नेताजी जाधव यांनी केले तर आभार दुलीचंद मेश्राम यांनी मांडले. स्पर्धा यशस्वीतेसाठी एस व्ही कुलकर्णी, धनश्री मदने, जान्हवी मदने, डॉ. दिपाली ममदे, भारती सुवर्णकार, विश्वजीत जाधव, आकाश मिरगे, गीतांजली नागरगोजे, रागिणी शिरसागर, अनुश्री कुलकर्णी आदी खेळाडू परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

0 Comments