कोविड-१९ प्रादुर्भाव काळात डॉक्टरांवर हल्ला होणे हे गंभीर बाब
संकट काळात गैरसमजातून पुन्हा असा प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्या
पालक मंत्री देशमुख यांचे प्रशासन आणि पोलीस विभागाला निर्देश
लातूर:(प्रतिनिधी) लातूर शहरातील अल्फा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये डॉ. दिनेश वर्मा यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा प्रकार अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब असून असे प्रकार पुन्हा घडूनयेत याची प्रशासन आणि पोलिस यंत्रणेने दक्षता घ्यावी असे निर्देश वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.
कोविड-१९ प्रादुर्भावाच्या या संकटकाळात डॉक्टर्स आणि सर्व आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. कोविड-१९ चे वाढते संकट लक्षात घेता खाजगी डॉक्टर्स आणि खाजगी हॉस्पिटलस् ही आता या सेवेत दाखल झाले आहेत. या परिस्थितीत आरोग्यसेवा देणाऱ्या सर्वच डॉक्टर्स, नर्स व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावेल असे वर्तन नागरिकांकडून होणे अपेक्षित असताना डॉक्टर दिनेश वर्मा यांच्यावर हल्ला होणे ही निषेधार्ह बाब आहे. रुग्ण आणि त्यांचे नातेवाइकाकडून गैरसमजातून प्रकार घडू नयेत यासाठी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे पालकमंत्र्यांच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.लातूर जिल्ह्यात असा प्रकार पुन्हा कोठेही घडणार नाही यादृष्टीने पोलीस विभागाने सतर्क राहावे असे निर्देश दिले असल्याचेही पालकमंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे.
0 Comments