Latest News

6/recent/ticker-posts

डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा खालचा वाडा-वरचा वाडा एक झाला

ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर यांच्या लेखणीतून


डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा 


खालचा वाडा-वरचा वाडा एक झाला


 



खाद्या घरातील कर्ता पुरुष आपल्यातून निघून गेला की,घर फुटते असे अनेकदा दिसून येते मात्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जाण्यानंतर एक घडले, निलंग्यातील खालचा वाडा आणि वरचा वाडा अर्थात अशोकराव पाटील निलंगेकर आणि संभाजीराव पाटील निलंगेकर हे दोन्ही कुटुंब दादा जाताना एकत्र करून गेले.दादांना कोरोना झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि कुटुंबाची धावपळ सुरू झाली.काहीही महत्त्वाचे बोलायचे असले की दादा आणि कुटुंबातला दुवा म्हणून अरविंद पाटील निलंगेकर यांनी जबाबदारी उचलली.दादांना लातुरातून पुण्याला हलवायचा निर्णय झाला आणि सर्व कुटुंब भाऊक झाले. डॉ.निलंगेकर यांच्या जाण्यामुळे कुटुंबाचा आधारवड कोसळला.चाळीस वर्षाचा राजकीय इतिहास एका क्षणात थांबला.त्यांच्या आठवणी एखाद्या पुस्तकासारख्या डोळ्यासमोरून चालत निघाल्या.आयुष्याच्या अंताचा भरवसा देता येत नसला तरीही दादा जे जगले ते आयुष्य खूप कमी लोकांच्या नशिबी आले असावे.खालचा आणि वरचा वाडा हे संकेत आहेत की नियतीची गरज हे येणारा काळ ठरवेल मात्र दादांच्या जाण्याने त्या घराण्याची ओळख पुढील काळात धूसर होईल की आणखी तेजोमय होईल हेही काळ ठरवणार आहे.आज दादांना जावून १४ दिवस होतील.मी कुटुंबातील आजचे दृश्य पाहतोय ते एका राजकीय कुटुंबाला साजेसे आणि राजकीय प्रगल्भता असणारे पाहतो आहे.कुटुंबात मागच्या १६ वर्षात निर्माण झालेली कटुता दादांनी संपवली आहे असे सध्या तरी मला वाटतेय.


या राजकीय कटूतेची बीजे माजी खासदार आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्नुषा रूपाताई निलंगेकर यांच्या भाजप प्रवेशापासून..मात्र तेव्हा ती राजकीय सोय वाटली होती.त्यापूर्वी लातूर जिल्ह्यातील विलासराव देशमुख आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा मराठा लिंगायत ठीणगीमध्ये पराभव झाला होता.हा पराभव शिवराज पाटील चाकूरकर यांनी घडवून आणला होता अश्या अफवानी लातूरचे राजकीय वातावरण तापले होते आणि संपूर्ण मराठा एकत्र आला.त्यात रुपाताई खासदार झाल्या.भाजपने या निमित्ताने निलंगेकर यांच्या कुटुंबात कमळ पोचवले होते.राजकीय वातावरण पेटले की कधी कधी अफवा जोर धरतात आणि त्यात मोठमोठ्या नेत्यांचा पराभव होतो..विलासरावजी आणि निलंगेकर यांच्या पराभवाच्या वेळेस अश्या मराठा लिंगायत वादाचा फटका बसलाच होता..विरोधक त्याचाच फायदा घेत असतात..निलंगेकर कायम आपल्या घरातच भाजप घुसल्याची धुकधुक कायम होती..आपण आयुष्यभर काँग्रेससाठी प्रामाणिक राहिलो हे काय घडले?याची चिंता कायम त्यांच्या मनात होती...पुढे व्ह्यायचे तेच झाले.संभाजीराव पाटील यांनी १६ वर्षांपूर्वी राजकारणात प्रवेश केला आणि आजोबांच्या विरोधात निवडणूक लढण्याचा पवित्रा घेतला.झाले कुटुंबाच्या संघर्षाची दुसरी ठिणगी पडली.एक पायलट सगळे सोडून राजकारणात आला.तोंडभरून कुटुंबातील अंतर्गत संघर्षाच्या कहाण्या चर्चिल्या जावू लागल्या.निलंगेकर कुटुंब बाजूला पडले पंचवीस वर्ष राजकारणात शुचिर्भूत आयुष्य जगलेल्या दादांच्या नशिबी नातवाच्या विरोधात संघर्ष करण्याची वेळ आली.कालांतराने दादाचे वार्धक्य वाढत होते.संभाजीराव पाटील यांचा राजकीय आलेख वाढत चालला होता.खालच्या वाड्यावरची वर्दळ कमी होवून वरच्या वाड्यावर वाढू लागली होती.मात्र आजोबा नातवांचे नाते अश्या राजकारणामुळे थोडेच संपणार होते.फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून संभाजीराव पाटील यांची वर्णी लागली आणि निलंगा तालुक्यात एकच चर्चा सुरू झाली.हा तालुका राजकारणाच्या बाबतीत अत्यंत सतर्क तालुका आहे.नेत्यावर एकदा प्रेम करायचे ठरले की भरभरून प्रेम करणारा हा तालुका..साहेबांच्या आशीर्वादामुळे,मोदींशी बोलल्यामुळे संभाजीराव यांची कॅबिनेटमध्ये वर्णी लागली असावी अशी चर्चा सुरू झाली.दादांना आणि संभाजीराव या दोघांनाच हे माहीत असावे.मात्र संभाजीराव कॅबिनेट मंत्री म्हणून छाप पाडून गेले आणि अशोकराव यांना पराभव पत्करावा लागला.पुन्हा चर्चा सुरू झाली दोघे एकच आहेत,शेवटी सत्ता दोघांच्याच घरात आहे.असा राजकीय प्रवास करत या कुटुंबाला सतत जोडत ठेवणारा दुवा म्हणून दादा काम करत राहिले.अरविंद पाटील आणि दादा यांच्या अनेकदा बैठका होत राहिल्या..आजोबांच्या राजकीय टिप्स संभाजीराव आणि अरविंद पाटील यांना मिळत राहिल्या.


दादा पुण्यात दवाखान्यात दाखल झाले आणि सगळे बंधू,काका भावनिक होवून दादांच्या सेवेत लागले.अरविंद पाटील पुण्यातच थांबले.डॉक्टरांशी सतत संपर्कात राहून दादांच्या प्रकृतीची काळजी घेवू लागले आणि कुटुंबाला माहिती देवू लागले.दादांनी कुटुंबाला एकत्र जोडण्याचा धागा यानिमित्ताने पाठीमागे सोडून गेला.


मी मागच्या १४ दिवसापासून पाहतोय..कुटुंब एकत्र दिसतेय,निलंगा तालुक्यातील जनतेला यापेक्षा मोठे काय हवे आहे.सतत तालुक्याच्या विकासासाठी विचार करत राहणारे दादा या सगळ्यांच्या रूपाने आपल्या सोबत आहेत.राजकारण क्षणिक असतं,माणूस म्हणून एकमेकाला जोडता आल पाहिजे.राजकीय व्यासपीठावर काका पुतण्या एकमेकांच्या विरोधात बोलत राहतील,राजकीय चर्चा झडत राहतील.दादांच्या जाण्याने दोन पिढ्या एक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले हे महत्त्वाचे.दोन्ही कुटुंब एकत्र नांदले तर कार्यकर्त्यांनाही विकासावर बोलता येईल,होणारी गैरसोय टाळता येईल..


दादा आपण एक दीपस्तंभ आहात नव्या पिढीचे..


आपण शिल्पकार आहात सिंचनाच्या विकासाचे..


आपल्या आत्म्यास शांती लाभो...


 


 ज्येष्ठ पत्रकार- संजय जेवरीकर


   


Post a Comment

0 Comments