जिल्हयात 30 सप्टेंबर 2020 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी
लातूर:( प्रतिनिधी) दि.2 - शासनाने कोरोना विषाणू ( कोव्हिड-19 ) प्रार्दुभाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा,1897, दिनांक 13 मार्च 2020 पासून लागु करुन अधिसूचना निर्गमित केलेली आहे. केंद्र शासनाकडून दिनांक 22 मार्च 2020 पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते व त्यानंतर पुढे विविध टप्प्यामध्ये सदरचे लॉकडाऊन माहे जून अखेरपर्यंत वाढविण्यात आले होते. तद्नंतर जून अखेर पासून विविध टप्प्यामध्ये अनलॉक प्रक्रिया सुरु असून त्याअनुषंगाने दिनांक 02 सप्टेंबर 2020 पासून दिनांक 30 सप्टेंबर 2020 दरम्यान अनुज्ञेय व प्रतिबंधीत बाबींसदर्भाच्या सूचना राज्य शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत.
कोरोना विषाणू (कोव्हिड-19) प्रार्दुभाव व प्रसार टाळण्याच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी जी.श्रीकांत यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये दिनांक 1 सप्टेंबर 2020 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत लातूर जिल्हयात 05 किंवा 05 पेक्षा जास्त लोक सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणेस या आदेशाव्दारे मनाई केली असून निर्देशीत केल्यानुसार पूढील बाबी लातूर जिल्हा हद्दीत दिनांक 30 सप्टेंबर 2020 पर्यंत लागू राहतील असे आदेश जारी केले आहे.
दिनांक 30 सप्टेंबर 2020 पर्यंत पूढील बाबी प्रतिबंधीत असतील. सर्व शैक्षणिक संस्था (विद्यालये,महाविद्यालये इतर शैक्षणिक संस्था ) बंद राहतील. ऑनलाईन, दूरशिक्षण (Distance Education) अध्ययन प्रक्रियेचे कामकाज करता येईल. सिनेमा गृहे, स्विमिंग पूल, मनोरंजनाची ठिकाणे, प्रेक्षागृहे (मॉल व मार्केट कॉम्प्लेक्स यांचेशी संलग्नीत सह), बार,सभागृह व तत्सम ठिकाणे बंद राहतील. सामाजिक, राजकीय खेळ, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि इतर मोठया प्रमाणावर लोकांची गर्दी होणारे कार्यक्रम प्रतिबंधीत असतील.अत्यावश्यक सेवेतील सर्व आस्थापना यापूर्वी निर्देशित केल्यानुसार नियमित व नियमानुसार सुरु राहतील. दिनांक 2 सप्टेंबर 2020 पासून पूढील बाबी मुद्देनिहाय नमूद निर्बंधासह लागू राहतील. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर सर्व आस्थापना वेळोवेळी निर्गमीत केलेल्या निर्बधासह सुरु ठेवता येतील. हॉटेल आणि लॉज कोवीड-19 चा प्रार्दुभाव वाढू नये याकरिता निर्गमीत नियमावलीचे पालन करुन आस्थापनेच्या 100 टक्के क्षमतेप्रमाणे सुरु ठेवता येतील.सर्व शासकीय कार्यालये पूढील निकषांचे पालन करुन सुरु राहतील. वर्ग अ व वर्ग ब संवर्गातील अधिकाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती राहील. वर्ग अ व वर्ग ब संवर्गा व्यतिरिक्त इतर कर्मचारी 50 टक्के किंवा कमीत कमी 50 कर्मचारी यापैकी जे अधिक असेल त्याक्षमतेनुसार उपस्थित राहतील. सर्व कार्यालयामध्ये शारीरिक अंतर पाळले जावे, मास्क वापरले जावे, तसेच कोवीड-19 चा प्रार्दुभाव वाढू नये याकरिता सर्व खबरदारी घेण्यात येईल. त्या करिताची दक्षता घेण्यासंदर्भात दक्षता अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. प्रत्येक कार्यालयामध्ये थर्मल स्कॅनिंग, हात धुण्याची सोय, आणि निर्जजुकीकरणाची प्रवेश व बाहेर पडण्याच्या ठिकाणी व्यवस्था करण्यात यावी. सर्व अधिकारी,कर्मचारी यांनी मास्कचा वापर करावा. सर्व खाजगी कार्यालये 30 टक्के पर्यंतच्या कर्मचारी क्षमतेनुसार सुरु ठेवता येईल. खाजगी कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या सर्व कर्मचारी यांना कोवीड-19 चा प्रार्दुभाव पसरु नये याकरिताची सर्व प्रकारची दक्षता घेण्यासंदर्भात अवगत करावे. आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या व्यक्ती व विविध प्रकारच्या मालाची ने-आण करणाऱ्या वाहनांच्या दळणवळणावर प्रतिबंध असणार नाहीत. प्रवासासाठी वाहनांना/ नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या ई-पास अथवा परवानगीची आवश्यकता असणार नाही.सर्व प्रकारची खाजगी प्रवासी वाहतुक परिवहनासंदर्भाच्या नियमावलीचे पालन करुन सुरु ठेवता येईल. खुल्या मैदानावरील शारीरिक क्रिया/व्यायाम यावर निर्बंध असणार नाहीत. वाहतुकीस पूढील प्रमाणे परवानगी असेल. टॅक्सी/कॅब- फक्त अत्यावश्यक कारणासाठी चालक+ तीन व्यक्ती. रिक्षा - फक्त अत्यावश्यक कारणासाठी चालक + दोन व्यक्ती. चार चाकी - फक्त अत्यावश्यक कारणासाठी चालक + तीन व्यक्ती. दुचाकी - चालक+एक व्यक्ती (हेल्मेट व मास्क बंधनकारक ) वरील प्रमाणे वाहतुकी दरम्यान सर्व व्यक्तींनी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. 65 वर्षावरील व्यक्ती, गर्भवती महिला व 10 वर्षाखालील मुलांनी अत्यावश्यक/ आरोग्यविषयक कारणाव्यतिरिक्त घराबाहेर जाणे टाळावे.अत्यावश्यक कारणाशिवाय इतर कारणासाठी घराबाहेर वावरणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता व शारीरिक अंतर राखणे आणि मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. वरील सर्व निर्बंधासह विविध विभागांनी स्वतंत्र आदेशाव्दारे निर्गमित केलेल्या नियमावलींचे पालन सर्व संबंधिताकडून केले जाईल याची दक्षता घ्यावी. यापूर्वी विशेष किंवा सर्वसाधारण आदेशाव्दारे परवानगी देण्यात आलेल्या सर्व बाबीं नियमितपणे त्यांना लागू असलेल्या नियमावलीनुसार सुरु राहतील. उपरोक्त बाबींसह या आदेशासोबतचे परिशिष्ठ-1 लातूर जिल्हा हद्दीत लागू राहील. तसेच या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था, अथवा समूह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी/ कर्मचारी यांचे विरुध्द कार्यवाही केली जाणार नाही. सदरील आदेश दिनांक 30 सप्टेंबर 2020 पर्यंत लागू राहतील. परिशिष्ठ-1 प्रमाणे पूढील आदेशाचे पालन होणे गरजेचे आहे. सार्वजनिक स्थळी, कामाच्या ठिकाणी व प्रवास करताना चेहऱ्यावर मास्क, रुमाल वापरणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तींतील अंतर किमान 06 फूट ठेवावे. दुकानामध्ये ग्राहकांची संख्या एकावेळी 05 पेक्षा जास्त असणार नाही. याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित दुकानदार/आस्थापना चालक यांचेवर राहील. मोठया प्रमाणावर गर्दी होणाऱ्या ठिकाणे प्रतिबंधीत असतील.किंवा विवाह समारंभासाठी 50 व्यक्तीपर्यंत उपस्थित राहण्यास परवानगी असेल तसेच अंत्यविधीसाठी 20 पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी असणार नाही.सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान ,धुम्रपान,गुटखा व तंबाखू इत्यादींचे सेवन करण्यास सक्त मनाई असेल. कामाच्या ठिकाणा बाबत अतिरिक्त सूचना पूढील प्रमाणे आहेत. शक्य असेल तेथे घरी राहून काम (Work From Home) करावे. प्रवेशाच्या ठिकाणी व बाहेर पडण्याच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर व हात धुण्याची सोय उपलब्ध् असावी. वेळोवेळी निर्जतुकीकरण करण्यात यावे. अधिकारी/कर्मचारी/कामगार यांचेमध्ये योग्य ते शारीरिक/सामाजिक अंतर ठेवण्यात यावे . शिफ्ट बदलामध्ये अंतर असावे. तसेच भोजनाच्या वेळांचे नियोजन व त्यावेळी शारीरिक अंतराचे पालन करण्यात यावे असेही आदेशात नमूद केले आहे.
****
0 Comments