बिनविरोध निवडीबद्दल आमदारांनी दिल्या शुभेच्छा
ढोकी आणि उटीच्या बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांनी घेतली सदिच्छा भेट
लातूर:(शहर प्रतिनिधी/ओमकार गोटेकर) एकत्रित विचारांतून गावाचा विकास साधता यावा म्हणून लातूर तालुक्यातील ढोकी आणि उटी (खु.) या गावातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्या. याबद्दल ढोकी आणि उटीतील बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांना आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी बुधवारी शुभेच्छा दिल्या व ग्रामस्थांचे आभार मानले. गावाचा विकास साधण्याबरोबरच विनाकारण होणारे वाद टळावेत, एकमेकांचा वेळ वाचावा आणि पैशाचा अपव्यय होऊ नये, शिवाय, कोरोनाचा प्रसार टाळता यावा म्हणून लातूर ग्रामीण मतदारसंघातील ढोकी आणि उटीच्या ग्रामपंचायत निवडणूक यंदा बिनविरोध झाल्या. निवड झालेल्या सदस्यांनी आमदार मा. धिरज देशमुख यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आ. धिरज देशमुख यांनी निवड झालेल्या सदस्यांचे अभिनंदन केले. यावेळी ढोकी (ता. लातूर) या गावातील दत्ता शिंदे, अनिरुध्द पाटील, ज्ञानेश्वर बोराडे यांच्यासह इतर ग्रामस्थ, उटी (खु.) गावातील रसूल पटेल, इतर सहकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील समस्या सोडवण्यास प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा धिरज देशमुख यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
0 Comments