औशातील पुरातन वेशी नंतर आता संरक्षण भिंतही नष्ट,ऐतिहासिक खुणा पुसून जाण्याच्या मार्गावर
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी-बी डी उबाळे) औसा शहरात लातूर वेस, निलंगा वेस, भुसार वेस, भादा वेस अशा चार वेशीसह संपूर्ण शहराच्या बाजूने संरक्षक तटबंदी असलेल्या भिंती हळू हळू नष्ट केल्या जात आहेत. भुसार वेस आणि लातूर वेस पाडण्यात आली असून निलंगा वेस व भादा वेस या मोठ्या प्रमाणावर शिल्लक राहिलेल्या पुरातन वेशीची डागडुजी करून ऐतिहासिक ठेवा जतन करणे महत्त्वाचे आहे. परंतु औसा नगर परिषद अशा पुरातन ऐतिहासिक वस्तूकडे दुर्लक्षित करीत आहे. औसा शहरात खादी कार्यालयापासून शासकीय दुध डेरी पर्यंत असणारी शहराची पुरातून संरक्षक भिंत जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. शासकीय दुध डेअरी आणि पूर्वीच्या गोपाळकृष्ण टॉकीज शेजारची संरक्षक भिंत पाडून सदरील जागेवर अतिक्रमण होत आहेत. वास्तविक पाहता पुरातन वस्तू जतन करणे महत्त्वाचे आहे. परंतु नगर परिषदेच्या दुर्लक्षपणामुळे भुसार वेशीपासुन शासकीय दूध डेरी पर्यंत असलेली जुनी तटबंदी भिंत पाडण्यात येत असून परिसरातील लोक या भिंतीच्या जागेवर अतिक्रमण करीत आहेत व संरक्षक भिंतीच्या बाजू वरील जुन्या वहिवाटी रस्त्यावर अतिक्रमणे करून दगड, विटा टाकुन तो मार्ग बंद करण्यात येत आहेत. ही जुनी तटबंदी भिंत पाडून रस्त्यावर दगड-गोटे पडल्यामुळे भुसार वेशीपासून दूध डेरी पर्यंतचा रस्ताही लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. शहरातील जुनी भिंत पाडून अतिक्रमण करणाऱ्यावर घटनास्थळाची पाहणी करून औसा नगरपरिषदेने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सय्यद मुजफ्फर अली इनामदार एमआयएम प्रमुख नेता यांनी प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली आहे.
0 Comments