रुग्णांच्या नातेवाइकांसाठी पत्रकार बंधु करत आहेत जेवणाची सुविधा
शेख बी जी
औसा: दि.२४ - शहरात उपचार घेणाऱ्या कोव्हिड रुग्णांच्या नातेवाईकांची लॉकडाऊन असल्याने पाणी व जेवणासाठी त्रेधात्रिपट होत आहे . ही बाब लक्षात घेऊन औशातील कांही पत्रकारांनी पुढाकार घेतला व रुग्णांच्या नातेवाईकांची दोन वेळा जेवणाची व्यवस्था केली आहे. याची सुरुवात शनिवार दि २४ एप्रिल रोजी येथील तहसीलदार शोभा पुजारी, नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख, पोलीस निरीक्षक शिवशंकर पटवारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेले कोव्हिड रुग्णांना तालुका प्रशासनाच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात येते. मात्र त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांना शहरातील सर्व हॉटेल्स बंद असल्याने मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत होते. ही बाब औशातील कांही पत्रकारांच्या नजरेसमोर आली , यावेळी काही पत्रकार पुढे आले आणि त्यांनी या रुग्णांच्या नातेवाईकांच्या दोन वेळेच्या भोजनाची व्यवस्था केली . त्याचे नियोजन केले व या सेवा उपक्रमाची सुरुवात औशाच्या तहसीलदार शोभा पुजारी , नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख , माजी नगराध्यक्ष जावेद शेख, पोलीस निरीक्षक शिवशंकर पटवारी, जिल्हा पत्रकार संघाचे सचिव सचिन मिटकरी, औसा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजय सगरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. रुग्णांच्या नातेवाईकांनी सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत आणि सायंकाळी सात ते आठ वाजण्याच्या कालावधीत भोजन ग्रामीण रुग्णालयाच्या समोर उपलब्ध असणार असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकार बांधवातर्फे करण्यात आले आहे. यावेळी नायब तहसीलदार शिवाजी कदम, पत्रकार जलील पठाण, राम कांबळे, विनायक मोरे, बाबुराजा ठेंगाडे, खुला प्रवर्ग शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष शेषेराव बिरादार आदी उपस्थित होते. डॉ. अफसर शेख युवा मंचच्या वतीने पाणी आणि फळे देणार यावेळी नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी पत्रकारांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून या रुग्णांच्या नातेवाईकांना स्वच्छ आणि आरोचे पाणी उपलब्ध करून देण्याचे अफसर शेख युवा मंचला सांगितले असून त्या बरोबरच फळेही उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
0 Comments