भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त "ज्ञानसागर" विशेषांकाचे अॅड अण्णाराव पाटील यांच्या हस्ते प्रकाशन
बी.डी. उबाळे
लातूर: महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त "मराठी अस्मितेचा इशारा" परिवाराने विशेष अंकाचे आयोजन केले होते. त्या अंकाचे आज जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून दिनांक 23 एप्रिल रोजी महा-राष्ट्र विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड अण्णाराव पाटील यांच्या शुभहस्ते त्यांच्या निवासस्थानी "गोविंदाग्रज" श्याम नगर, लातूर येथे संपन्न झाले. यावेळी मराठी अस्मितेचा इशारा परिवाराचे संपादक के. वाय. पटवेकर, उपसंपादक प्रा.बी.जी. शेख, के.के. कुलकर्णी, जावेद मुजावर उपस्थित होते. सुरुवातीला संपादक के. वाय. पटवेकर यांचा अॅड आण्णाराव पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. हा प्रकाशन सोहळा सर्वांना पाहता यावा म्हणून सोशल मीडियाच्या मार्फत फेसबुक लाईव्ह करण्यात आले. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास खूप मोठा आहे. त्यांना समजून घेण्यासाठी संपूर्ण संविधान वाचावे लागेल. तेव्हा कुठे आपल्याला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कळतील. इशारा परिवाराने "ज्ञानसागर" नावाने त्यांच्या जीवनावर आधारित विशेषांक काढून काही अंशी समाजासमोर त्यांना आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दल मी "मराठी अस्मितेचा इशारा" परिवाराचे अभिनंदन करतो. अँड. आण्णाराव पाटील यांनी त्यांच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी सविस्तर अशी माहिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या विशेष फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत हजारे यांनी तर आभार प्रदर्शन उपसंपादक प्रा.बी.जी.शेख यांनी केले. Covid-19 नियमाचे पालन करत, सोशल डिस्टन्स चा वापर करून हा कार्यक्रम संपन्न झाला.
0 Comments