"इशारा NEWS" इफेक्ट -->
सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या विहीरीचे काम अखेर सुरू
प्रा. शेख बी जी
औसा:दि.२१ - तालुक्यातील मौजे भादा येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेची विहीर मागच्या वर्षी २०२० ला मंजूर झाली होती. मात्र मानपानाच्या वाद्यात हे काम गावातील काही अतिहुशार मंडळीकडून थांबवण्यात आले होते. हे थांबलेले काम का थांबले? या प्रकरणाचा पाठपुरावा इशारा परिवाराने नेहमी लावून धरला होता. त्याचा परिणाम असा झाला की नेहमीप्रमाणे यावर्षी पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने व वारंवार हा प्रश्न मांडला गेल्याने शेवटी हे काम दिनांक २० एप्रिल रोजी सुरू करण्यात आले. भादा गावामध्ये पाण्याचा प्रश्न प्रतिवर्षी निर्माण होतो. गावाला अनेक योजना आल्या होत्या, त्या योजनांचा वापरही करण्यात आला. मात्र गावाला पाणी पुरेसे मिळाले नाही.सतत हा प्रश्न गावाला भेडसावत होता.म्हणून सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेतून मंजूर झालेली विहीर गेल्या वर्षी म्हणजे २०२० ला मंजूर करण्यात आली होती. मात्र काही गावातील नेतेमंडळींनी हे काम थांबवले होते.त्याचा परिणाम मागच्या निवडणुकीत संबंधित नेत्याला भोगावा लागला. यापूर्वी गावाला 48 लाख रुपयांची योजना मंजूर झाली होती, ही योजना पाण्यातच गेली की काय असा प्रश्न नागरिक करत होते. गावातील पाण्याचा प्रश्न "इशारा" ने सतत लावून धरल्याने नाईलाजास्तव या वर्षी हे काम सुरू करावे लागले. या विहिरीने संपूर्ण गावाची तहान पूर्ण होईलच असे सांगता येत नाही. तरी काही अंशी हा प्रश्न मार्गी लागणार आहे.गावात वेगवेगळ्या कुपनलिकेद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात असतो. मात्र त्यामध्ये अधूनमधून बिघाड होत असल्याने पाण्याचा प्रश्न सतत निर्माण होत होता. सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेतील या विहिरीच्या कामाने हा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा आहे.
0 Comments