पत्रकार गझाला म. खान यांच्या लेखणीतून...
पर्यावरणाच्या पर्यायाने स्वतःच्या र्हासाला सर्वस्वी जबाबदार ?
"देता शिक्षण पर्यावरणाचे
मानव जातीच्या रक्षणाचे
करूनी दूर सावट प्रदूषणाचे
फेडूया ॠण निसर्गाचे"
पर्यावरण ही एक व्यापक संकल्पना आहे.अनेकविध घटकांचा यात समावेश होतो. विसाव्या शतकात विज्ञानाने गरुड झेप घेतली आणि मानवाला सुखसोयींच वरदान दिलं पण स्वतःच्या विकासा सोबत मानव निसर्गाच्या र्हासाला कारणीभूत ठरला.मानव आणि निसर्गाचे नाते जरी दृढ स्वरूपाचे असले तरी आज पर्यावरणीय असमतोलास, बिघडलेल्या ऋतू चक्रास जबाबदार मानव आहे. पर्यावरणीय चक्र आज काल मध्ये बिघडलेले नाही तर त्या मागे बर्याच वर्षांचा समावेश आहे. माणसाचा नैसर्गिक गोष्टीत हस्तक्षेप वाढला त्याने विकासही साधला पण दूसरा पैलू निसर्गाच्या र्हासाच्या सूरवातीस कारणीभूत ठरला. ग्लोबल वॉर्मिंग, पूर महापूर, अवर्षण, वाढते प्रदूषण, बदललेले ऋतू चक्र, ओझोनचा थर कमी होत जाणे, जमिनीची धूप, बेसुमार वृक्षतोड, जंगलाचे काँक्रिटीकरण करणे, घटत चाललेली भूजल पातळी, वेळी अवेळी पडणारा पाऊस, वाढते हरितगृह वायुचे प्रदूषण या सर्व दृष्ट चक्रात मानवाने निसर्गा सोबत स्वतःलाही खेचले आहे. आपत्तींमध्ये अपवादात्मक वेळा आपत्तीचे विधायक परिणाम दिसून येतात पण त्यामानाने विध्वंस जास्ती दिसून येतो. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने जागतिक पातळीवर प्रयत्न झाले व होत आहेत, यात १९७२ मधील स्टॉकहोम स्वीडन येथील परिषद पर्यावरण शिक्षणाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरली याच धर्तीवर भारतातही प्रयत्न झाले, होत आहेत. निसर्गात घडणार्या प्रत्येक घटनांवर मानवाचे नियंत्रण नसते कारण अश्या बर्याच घटना आहेत ज्या तो रोखू शकत नाही. मात्र ज्या गोष्टी त्याच्या हातात आहेत त्या त्याने नक्की कराव्यात अर्थात नैसर्गिक साधनसामुग्री, संसाधन कुठल्याही कारखान्यात उत्पादित करता येत नाहीत त्यामुळे आपल्या मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग या संसाधनां च्या बदल्यात पर्यायी व्यवस्था उभी करता येत असेल आणि ती ही निसर्गाला अबाधित राखून तर नक्कीच त्याचा उपयोग माणसाने करावा. "जल" ला जीवन संबोधले गेले आहे कारण माणूस अन्ना विना जगु शकतो पण पाण्याशिवाय नाही. शेती, उद्योग-धंदे, व्यवसाय, वीज निर्मिती, प्रत्येक ठिकाणी पाणी अत्यावश्यक असते. पाण्याचे व्यवस्थापन योग्य रीतीने करणे आजच्या आणि येणार्या पिढीसाठी निकडीचे आहे. यासाठी जल साक्षरता अत्यावश्यक केवळ त्यामुळेच पाण्याचा अपव्यय टाळता येवू शकतो. अर्ध्या पेल्या ने तहान भागत असेल तर अख्खा पेला भरून उरलेले पाणी फेकून देण्यात आपलाच तोटा आहे. अवर्षणप्रवण भागात पाण्याच्या संचयनाच्या दृष्टीने प्रयत्न होताना दिसून आले. शासन, विविध संघटना आणि मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून जलसंवर्धनाची कामे जलयूक्त शिवार या उपक्रमा अंतर्गत हाती घेण्यात आली, वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातुन आमिर खान ने ही प्रयत्न केले यामुळे कोरडे ठक पडलेल्या नदीपात्रांना नवीन जीवन मिळाले. बदललेल्या ऋतू चक्राचा सर्वात जास्त परिणाम शेतकर्यावर होताना दिसतो. अवकाळी पावसाने त्याचे हाता तोंडाला आलेले पीक आडवे होते. पावसाला तर तो रोखू शकत नाही पण दुष्काळाने दूबार पेरणी, तिबार पेरणीच्या संकटातून नक्कीच पिकाला वाचवू शकतो. यासाठी पावसाचे पाणी आणि उपलब्ध पाणी यांची योग्य सांगड घालता आली तर दुष्काळ हा शब्दच शेतकऱ्याने विसरून जावा. पिकांसाठी सिंचन पद्धतींचा वापर पाणी व्यवस्थापनातील महत्त्वाचा घटक म्हणता येईल यामुळे पिके पिकवता ही येतील, जगवताही येतील आणि पाण्याचा अपव्यय टाळता ही येईल. या शिवाय शेततळी बांधून शेताच्या बांधावर विविध झाडे लावून पावसाचे पाणीही अडवून शेतीसाठी वापरता येईल. पाण्याचा विचार करत असताना भूजल साठे यांचे महत्व ही तितकेच आहे.पावसाचे पाणी जमिनीत मुरते आणि भूजल पातळी वाढते या गोष्टी आपण शाळेत शिकलेल्या आहेत पण आपना सर्वांची अवस्था कळत आहे मात्र वळत नाही अशी झालेली आहे. नदीपात्रांच्या आसपास असणार्या प्रदेशांमधे असणारी झाडंझूडपं, गवत कुरण,जमिनीत पाणी जिरवण्यासाठी महत्वपूर्ण असतात.लोकसंख्या वाढली ठिकठिकाणी कूपनलिका खोदण्यात आल्या.जंगलाचे काँक्रिटीकरण झाले आणि वसाहतीं साठी हे प्रदेश साफ करण्यात आली परिणाम जमिनीत पाणी मूरण्यावर झाला. पावसाळ्यात रानावनांतून झूळझूळ वाहणारे झरे ते उपलब्ध सर्व जलस्त्रोतांचा वापर मानवाने त्याच्या उपयोगासाठी केलेला आहे.बंड, बंधारे बांधने, घराच्या आसपास शोष खड्डे करणे,पावसाचे पाणी आणि शक्य तितक्या मार्गाने पाणी अडवून जमिनीत जिरवण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न भूजल साठे समृद्ध करण्यासाठी उपयोगी पडेल आणि भूजल साठ्यांचे पुनर्भरण करण्यात आणि भूजलसाठ्यांना पुनरूज्जीवीत करण्यास हे प्रयत्न लाखमोलाचे ठरतील यात काडीमात्र शंका नाही नैसर्गिक साधनसामुग्रीच्या संवर्धनासाठी शिक्षणातून प्रयत्न होणे गरजेचे आहे कारण शिक्षणातून बदल घडत असतो. समाजाला बदलण्याची ताकद, क्रांती घडविण्याची ताकद, मोठा लोकसहभाग एकजुट करण्याची ताकद शिक्षणात आहे त्यामूळे सगळ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून निसर्ग वाचवण्यासाठी प्रयत्न करावे.
गझाला म. खान(पत्रकार)

0 Comments