राजकीय स्वार्थापोटी निटूर ग्रा.पं.च्या विरोधात खोट्या तक्रारी- सरपंच परमेश्वर हासबे
निटूर: ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना मुलभूत सोयी- सुविधा पुरविण्याचे काम सातत्याने केले जात आहे.असे असतानाही केवळ राजकीय स्वार्थापोटी ग्रामपंचायतीच्या विरोधात खोट्या तक्रारी केल्या जात आहेत.अशा तक्रारींविरोधात कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा सरपंच परमेश्वर हासबे यांनी दिला आहे. याबाबत माहिती देताना सरपंच परमेश्वर हसबे यांनी सांगितले की,लातूर-जहिराबाद राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना २०१८ साली गावाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली होती. निटूर व निटूर मोड या दोन्ही ठिकाणची जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा बंद होता.यामुळे गाव आणि विनायक नगर परिसरातील नागरिक पाणीपुरवठ्याबाबत विचारणा करत होते. यासंदर्भात ग्रामपंचायतीने संबंधित कंपनीला कळवून जलवाहिनी दुरुस्त करून देण्याची विनंती केली होती. कंपनीने दुरुस्ती न केल्याने ग्रामपंचायतीने जिल्हाधिकार्यांकडे तक्रार दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. दरम्यानच्या काळात महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने आपण गावाचे सर्वेक्षण करून दुरुस्तीचे साहित्य घेऊन ठेवले असल्याचे सांगितले. दुरुस्तीचे काम करणारी एजन्सी कंपनीकडे नाही. त्यामुळे आधी खरेदी केलेले साहित्य ग्रामपंचायतीला देऊ. त्यांनी स्वतः दुरुस्ती करून घ्यावी,असे कंपनीचे संचालक घोरपडे यांनी म्हटले होते.या विनंती नंतर ग्रामस्थांच्या संतप्त भावना लक्षात घेत ग्रामपंचायतीने कंपनीकडून जेसीबी,पाईप व इतर काही साहित्य घेतले. दुरुस्तीचे काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत केला. कंपनीकडून घेतलेले साहित्य जलवाहिन्यांच्या दुरुस्त्या साठीच वापरण्यात आले. या घटनेला ६ महिने उलटून गेल्यानंतर राजकीय स्वार्थापोटी गावचा रहिवासीही नसणाऱ्या व्यक्तीने ग्रामपंचायतीची जाणीवपूर्वक बदनामी करणारी तक्रार दिली आहे. मागील चार वर्षात ग्रामपंचायतीने केलेल्या विकासकामांमुळे काहींचे राजकीय खच्चीकरण झाले असू शकते.त्यामुळे खोट्या तक्रारी देऊन बदनामी करण्याचा डाव आखला जात आहे. या संदर्भात आवश्यक ती कागदपत्रे ग्रामपंचायतीकडे उपलब्ध आहेत. गावातील नागरिकांची गरज आणि कंपनीच्या विनंती वरूनच ग्रामपंचायतीने दुरुस्तीचे काम केलेले आहे. कंपनीकडून घेतलेले साहित्य इतर कोठेही वापरलेले नाही. त्यामुळे खोट्या तक्रारी करणाऱ्यांच्या विरोधात ग्रामपंचायत कायदेशीर कार्यवाही करेल, असा इशारा सरपंच परमेश्वर हसबे यांनी "मराठी अस्मितेचा इशारा" च्या प्रतिनिधीशी बोलताना दिला आहे.
0 Comments