Latest News

6/recent/ticker-posts

दादा, तुम्ही कधीच विस्मृतीत जाऊ शकणार नाही !

डॉ. हंसराज बाहेती यांच्या लेखणीतून...

दादा, तुम्ही कधीच विस्मृतीत जाऊ शकणार नाही !

ब्बल तीन वर्षे होतील. दादा आपल्यातून गेले.  मराठवाड्याच्या घरंदाज आणि खानदानी राजकारणाची परंपरा असलेला बालाघाटच्या कुशीतील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर नावाचा सिंह एकाएकी गेला. पण एकाएकी तरी कसे म्हणावे?  पोटच्या पोराचा अपमृत्यु आणि दोन पराजय पचवणारा हा बाप तसा राजकारणात आणि समाजकारणातही खमक्या होता. पण नियतीचा खेळच विचित्र म्हणायचा. दादा भरल्या ताटावरुन उठून गेले.  हा आघात तुम्हा - आम्हा सर्वांच्या सहन करण्यापलीकडचा.

मी दादांच्या गावचाच, निलंग्याचा. मला जेव्हापासून समजतं तेव्हा पासून त्यांना पाहत आलेलो. ते आधी गावातील शिवाजी विद्यालयाच्या बाजूला एक छोट्याश्या घरात राहत असत. तो परिसर एक छोट्या वस्तीवजा.  त्यांच्या घराला लागूनच एका चिरेबंदी वाड्यात गावचे पोलीस पाटील व्यंकटराव पाटील राहत आणि त्याच्या जवळ निलंगा परिसरात दरारा असलेले बळीराम पाटील यांचा वाडा. 


 दादांचं राहणीमान मात्र एकदम टापटीप.  पांढरा स्वच्छ लॉन्ड्रीतून आलेला सदरा, मर्सराईज्ड पांढरे शुभ्र धोतर, डोक्यावर पांढरी ऐटबाज आणि टोकदार व उजवीकडे थोडी वळलेली गांधी टोपी, पायात पॉलीश केलेले चकाचक काळे बूट.  राजकारण्यांमध्ये अगदी असं टापटीप राहण्याची सुरुवातच दादांनी केली असावी. नंतरच्या काळात शिवराज पाटील, संग्राम माकणीकर, विलासराव देशमुख आणि इतरांनीही तोच पायंडा पुढे नेला.  

निलंग्यातील वकिलीपासून ते थेट मुंबईत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंतचा त्यांचा प्रवास फारच संघर्षपूर्ण आणि रोमांचक राहिला.  समाजजीवनात काही लोक केवळ यशासाठी जगतात. धडपडतात. तर काही लोक तत्वासाठी जगतात अन् लढतातही.  यश मिळवण्यासाठी जीवनमूल्ये पायदळी तुडवणा­यांपैकी दादा नक्कीच नव्हते. त्या काळात निलंग्याचं राजकारण म्हणजे  रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग  असंच होतं.  दादांकडे त्यांच्या अखेरच्या पंधरा - वीस वर्षांच्या काळात आम्ही दर महिना दोन महिन्यांनी भेटण्यासाठी जात असू. त्याला कारणही तसंच होतं.  त्यांच्या छोट्या मोठ्या आरोग्याचे विषय असायचे.  दादा खूप चिकित्सक वृत्तीचे.  मुंबईला तज्ञांना दाखवायचे. विशेष करुन डॉ. कुमार हे त्यांचे फिजिशियन. पण दाखवून आल्यानंतर फोन करायचे आणि चर्चेसाठी या असं म्हणायचे. येताना तुझ्या मित्रांना पत्रकार जयप्रकाश दगडे, डॉ. सोमनाथ रोडे वगैरेना घेऊन ये आणि सगळी कामं संपवूनच ये, असं सांगायला ते विसरायचे नाही. बैठकीत तब्येतीचे बोलणे झाले, की अनेक विषयांवर चर्चा व्हायच्या.  त्यात राजकारणाचे विषय असायचे, विकासाचे मुद्दे असायचे, त्यांनी पहाडाएवढ्या करुन ठेवलेल्या कामांचा उल्लेख असायचा. जिल्ह्यात तेव्हाच्या राजकारणात तीन शक्तिकेंद्रे होती. शिवाजीराव पाटील निलंगेकर, शिवराज पाटील चाकूरकर आणि विलासराव देशमुख. सत्तेचा पेंड्युलम सतत त्यांच्याभोवतीच फिरत असायचा.  राजकारणाला एकदम कलाटणी मिळाली, ती निलंगेकर थेट मुख्यमंत्री झाले तेव्हा. त्यावेळी विलासरावांना मंत्रीमंडळात स्थान मिळालं नाही. विलासरावजी आमचे सगळयांचे खूप प्रिय.  बाभळगावला आम्ही भेटण्यासाठी गेलो. मनांत थोडी धाकधूक होती.  फारशी गर्दी नव्हती. मी, रोडे सर, जयप्रकाश दगडे, वसंत पाटील, रामानुज रांदड, ईश्वर बाहेती वगैरे.  बैठकीत शिरलो. मला बघताच विलासरावांनी मिश्किलपणे मोठ्याने आवाज दिला... या निलंगेकर बाहेती, या... काय म्हणतात तुमचे निलंगेकर साहेब... ?  साहेबांच्या या प्रश्नानंतर त्यांच्यासकट आम्ही सगळेच दिलखुलास हसलो. गप्पा झाल्या. पण विलासरावांच्या चेह­यावर निराशेचा लवलेशही नव्हता.

 लवकरच निलंगेकरांचं मुख्यमंत्रीपद एका कटाचा बळी होऊन गेलं. आम्ही सगळे व्यथित होऊन निलंग्याला त्यांच्या बैठकीत जमलो. निलंगेकर साहेब लगेच आले. अगदी नॉर्मल. चेह­यावरचं तेज तसंच कायम.  बोलता बोलता म्हणाले राजकारण हे शाळेतल्या खुर्ची - रेस सारखं झालं आहे.  मोकळेपणाने सगळा घटनाक्रम ते सांगत होते.  तो इथं लिहिणं योग्य नाही.  पण दादा लगेचच कामाला लागले होते. मी अनेक वेळा बघितलंय. या नेत्याला निलंग्यात आपल्या घरी सकाळी स्वत:ची दाढी करण्यासाठी सुद्धा किमान एक तास तरी लागायचा.  घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवून समोर असलेल्या ढेळजात खांबाला आरसा लावून त्यासमोर बसून ते दाढी करायचे. अडले नडलेले सरळ घरात येत.  ही येणारी मंडळी सर्व साधी, गरीब, वंचित असायची.  दादांना नमस्कार करत आणि आपलं काम सांगत.  हातातला ब्रश बाजूला ठेवून दादा दाढी करता करता मधेच थांबत. गालांना लावलेला साबण नॅपकीन नं पुसत. लगेच संबंधित अधिका­याला फोन करुन,  हे काम लगेच करा अशी विनंती करत. एकीकडं दाढी करणं, मधेच थांबणं, अधिकारी - पोलीस - जिल्हा कार्यालयातील पदाधिकारी यांना आदेश ... विनंत्या ... पुन्हा राहिलेली दाढी करणं चालू... याला म्हणायचं जनसंपर्क... आताच्या प्रोटोकॉलनं जनसंपर्क अभियान चालविणा­यांना हा कसा कळणार !  दादांनी अनेक चढउतार अनुभवले. पण ते कधी खचून गेले नाहीत. जातीयवादाच्या वाटेने तर ते चुकूनही गेले नाहीत. सदैव गोरगरीब, अठरा पगड जातीच्या लोकांना पोटाशी धरत पुढे जात राहिले.  नात्यागोत्याचं राजकारण त्यांनी कधी केलं नाही, पण त्याची किंमतही त्यांनी अनेकदा मोजली.  माळी, कोळी, बंडगर, धनगर, मारवाड़ी, दलित, वंचित, लोहार, सोनार, चांभार, ब्राह्मण हे त्यांचे खंदे समर्थक अगदी शेवटपर्यंत खंदेच राहिले.  दादांच्या घरात दरारा मात्र त्यांच्या भाऊराव ड्रायव्हरचा. याच निष्ठावंत भाऊरावाला त्यांनी पुढे निलंगा नगर परिषदेचा थेट नगराध्यक्ष केलं. शिक्षणापेक्षाही शहाणपण महत्वाचं असतं, हेच त्यांना त्यावेळी कदाचित अधोरेखित करायचं असावं. घरात सतत त्यांच्या सेवेत असणारा निळू हा त्यांचा खास मदतनीस. पण तोही कधी कधी दादांना दरडावून अधिकारानं ... साखर जरा कमी टाका चहात असं सर्वांच्या समक्ष सांगायचा. दादांना त्याचं विशेष कधी वाटलेलं दिसलं नाही. ते निमूटपणे साखरेचा हात आखडता घ्यायचे.

दादा म्हणजे खरंच एक अद्भुत रसायन होतं.  सर्वांनाच ते प्राणप्रिय होते. त्यांच्या अशोक बंगल्याच्या बाजूलाच वंचितांची वस्ती. पण या वस्तीभोवतीही दादांनी मायेची ओंजळ धरली. वस्तीतल्या एकालाही त्यांनी कधी त्रास होऊ दिला नाही. त्यांच्या घरातील प्रत्येकाच्या हाताला काही ना काही काम, नोकरी लावून दिली. मला आठवतंय, मुंबईत एकदा मित्रांसमवेत टॅक्सीमधे बसून जात असताना योगायोगाने टॅक्सीवाला निलंग्याचाच निघाला. तुम्ही मुंबईत कसे, असं आम्ही विचारता, तो म्हणाला...  दादा मंत्री असताना मी काम मागायला गेलो होतो. दादांनी मला विचारलं, तुला ड्रायव्हिंग लायसेन्स आहे का ?  मी होय म्हणताच दादांनी मला बँकेला फोन करुन कर्जावर टॅक्सी द्यायला लावली. दहा वर्षे झाली साहेब, माझं मस्त चाललंय. अशी अनेक उदाहरणं महाराष्ट्रातल्या गावागावात आढळतील. गावच्या तहसीलदार, डेप्युटी इंजीनिअर यांना सुध्दा ते स्वत: साहेब म्हणून बोलायचे. निलंगा हे गाव तसं एकीकडे कट्टर आर्यसमाजी, आणि दुसरीकडे क्रूर रझाकारांचं केंद्र होतं त्या काळात. पण पोलीस अॅक्शन नंतरच्या काळात मात्र दादांमुळं एकही मोठा दंगा निलंग्यात झाला नाही. मुस्लिम बांधवांना दादा म्हणजे खुदा समानच वाटायचे.  

आमचे रोडे सर नेहमी शिरुर अनंतपाळच्या एका सभेचं उदाहरण देतात. त्या कार्यक्रमात निलंगेकर साहेबांसोबत रोडे सरही वक्ते होते. दादांनी त्यांच्या भाषणात लोकांना जाहीरपणे विचारलं ... मी अध्यक्ष असलेल्या कोणत्याही संस्थेत, शाळा कॉलेजेस मध्ये कोणीही मी त्यांच्याकडून नोकरीसाठी पैसे घेतले किंवा मागितले असतील तर आत्ता इथेच उठून सांगा. मी याच जागेवर सर्वांच्या समक्ष फाशी घेईन. याला म्हणतात स्वच्छ चारित्र्य. अटलजी त्यांच्या एका कवितेत नेहमी म्हणायचे मेरा खो गया है मित्र, जिसका नाम है चरित्र ! दादांनी आपला हा मित्र मात्र कधी गमावला नाही. पत्रकार जयप्रकाश दगडेही नेहमी सांगतात की अंबुलगा कारखान्याच्या एका भरगच्च सभेत निलंगेकरांनी जाहीर आवाहन केलं होतं, हजारो तरुणांना मी नोकरी मिळवून दिली पण कोणाकडून एक पैसा घेतला असेल तर सांगा, सगळ्या पदांवरुन मी एका क्षणात पायउतार होईन.  असं धाडस केवळ दादाच करु शकतात.

पण अशा उंचीच्या दादांना सुध्दा दोन वेळा पराजयाचा सामना करावा लागला. पहिला कॉ. माणिक जाधवांकडून. त्याच वेळी लातूरला विलासराव कव्हेकरांशी झुंज देत होते. आम्ही सर्व मित्रमंडळी बाभळगावला गेलो होतो.  विलासरावजींनी मला, जयप्रकाश दगडे, प्रा. रोडे सर, प्रा. मग्गीरवार आणि अनेकांना जनमानसाचा अंदाज घेऊन येण्यास सांगितले होते. बैठक सुरु झाली.  सगळे फार सावधपणे बोलत होते.  विलासरावजींनाही अंदाज येतच असावा. शेवटी विलासरावजी म्हणाले, एक गोष्ट मात्र निश्चित समजा. लातूरातून मी आणि निलंग्यातून निलंगेकर निवडणूक हारले, तर महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकारच येणार नाही. तसंच झालं. दादांचा दुसरा पराभव मात्र फार दाहक होता.  सगळया महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं.  त्या लढाईला अनेक पदर होते. सर्व गाव सुन्न झालं होतं.  रामायण - महाभारतातील कथा सुद्धा कमी पडत होत्या. दादा निवडून आले नाहीत. त्यानंतर काही काळ चाललेला कार्यकर्त्यांचा हैदोस संपला.  तो संपल्यानंतर आम्ही दादांना भेटण्यासाठी निलंग्याला गेलो.  जाताना नेपोलियनचं एक वाक्य मनात सतत घोळत होतं...  काही पराजय हे विजयापेक्षाही जास्त प्रभावी असतात. दादा बैठकीत आले. चेह­यावर निराशेचा लवलेशही नव्हता.  सर्वांचा नमस्कार स्विकारुन बसता बसता म्हणाले, चला... नवी पिढी पुढे जात आहे... याला म्हणतात मनाचा मोठेपणा आणि दिलदार वृत्तीचा राजकारणी...

सत्ता सदैव त्यांच्या परिघात होती व ती त्यांनी परिसराच्या विकासासाठी आणि सामान्य लोकांच्या जीवनात अच्छे दिन यावेत यासाठीच वापरली. विकासाची दर्जेदार कामे करुन घ्यायची असतील, तर कार्यकर्तेही दर्जेदार असावे लागतात. आणि तरच उत्तम अधिकारी टिकतात आणि विकासही घडवून आणतात.  दादा देशभर वा­यासारखे फिरायचे पण ते निलंग्याच्या मातीला कायम जडलेले होते.  म्हणौनि माझे नित्य नवे । श्वासोच्छ्वासही प्रबंध होआवे ।। असं माऊलींनी म्हणून ठेवलं आहे. दादांचा श्वासोच्छ्वासही विकासाचे अनेक प्रबंध लिहून गेला. 

दादांसारखी माणसं नव्या पिढीला सतत आदर्शाचा, लोककल्याणाचा, जनसेवेचा मार्ग दाखवत राहतील. समाज जीवनात व राजकारणात विचारांवरची आपली निष्ठा आणि आत्मविश्वास कसा असावा याचं जितंजागतं उदाहरण म्हणून येणा­या अनेक पिढ्या दादांकडे निर्देश करत राहतील.  

दादांची आमची अखेरची भेट माझ्या काळजात रुतून बसली आहे. कदाचित दादांना नियतीच्या हाका ऐकू येत असाव्यात. ते आजारी होते पण आमच्या ध्यानीमनीही आले नाही की, ही या शूचिर्भूत राजकारण्याची आणि आमची अखेरची भेट ठरेल.  डोळ्याचं पातं लवतं न लवतं, तोच राजकारणातलं एक भीष्मपर्व संपून गेलं.  

पण दादा, तुम्ही गेलाच नाहीत. तुम्ही इथेच आहात. आमच्या या समुदायात आहात. आमच्याबरोबर आहात. तुम्ही दिलेलं सामर्थ्य या दलित, वंचित, गोरगरीब, शेतकरी - शेतमजुरांमध्ये कायम संचारत राहणार आहे. तुमचा विचार समोर ठेवून आमची जगण्याची लढाई चालूच राहणार आहे.. 

दादांचा श्वास थांबला. पण त्यांच्या थांबलेल्या श्वासांनी लाखो लोकांच्या मनांत बांधलेली जलमंदिरे आणि ज्ञानमंदिरे चिरंतन टिकणारी आहेत. 

माणसं मरतात.  पण आदर्श कधीच मरत नसतात. दादा, तुम्ही कधीच विस्मृतीत जाऊ शकणार नाहीत.. !!

डॉ. हंसराज बाहेती,निलंगा 

Post a Comment

0 Comments