Latest News

6/recent/ticker-posts

सुनंदा माळी व मीरा यादव यांचा मुरुडमध्ये सेवापूर्ती सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

सुनंदा माळी व मीरा यादव यांचा मुरुडमध्ये सेवापूर्ती सत्कार समारंभ उत्साहात संपन्न


मुरुड (ता. लातूर) : पारुनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहशिक्षिका सुनंदा माळी व बोरगाव शाळेच्या मीरा यादव यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार करताना दिलीपदादा नाडे, श्रीपती माळी व अन्य.

मुरुड : सेवानिवृत्तीचा सत्कार हा प्रत्येक कर्मचाऱ्याच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण क्षण असतो. अशा वेळी सेवा कालावधीतील आठवणींना उजाळा देत, सहकार्य केलेल्या व्यक्तींना आमंत्रित करून स्नेहमेळावा स्वरूपात कार्यक्रम साजरा करावा, असे मत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तसेच डीडीएन एसएफए लिमिटेड कारखान्याचे चेअरमन दिलीपदादा नाडे यांनी व्यक्त केले. येथील पारुनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहशिक्षिका सुनंदा माळी-गोरे व बोरगाव शाळेतील सहशिक्षिका मीरा यादव-बिडवे यांच्या सेवापूर्ती निमित्त मंगळवारी (दि. २९) सह्याद्री पोदार स्कूलमध्ये आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी चंद्राहास म्हेत्रे होते. उपस्थित मान्यवरांमध्ये उपसरपंच हनुमंतबापू नागटिळक, प्रा. अंकुश नाडे, माजी उपसरपंच श्रीपती माळी, केंद्रप्रमुख नंदा आचार्य, शाळेचे प्राचार्य विराज माकणीकर यांचा समावेश होता.

नाडे म्हणाले, “सेवापूर्तीचा कार्यक्रम हा केवळ औपचारिक नसून, दिवसभराचा स्नेहमेळावा असावा. या वेळी सहकारी, प्रमुख व्यक्ती, विद्यार्थी यांना आमंत्रित करावे. त्यांच्या आठवणींमधून सेवाकाळ उजळून निघतो. मुरुडमधील चांगल्या शैक्षणिक वातावरणात जिल्हा परिषद शिक्षकांचे योगदान मोठे आहे.” उपसरपंच नागटिळक यांनीही दोन्ही शिक्षिकांच्या सेवाकार्याचे कौतुक करत त्यांच्या योगदानाची प्रशंसा केली. प्रा. नाडे यांनी शैक्षणिक क्षेत्राच्या प्रगतीसाठी सर्व घटकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. शिक्षण विस्तार अधिकारी चंद्राहास म्हेत्रे यांनीही दोन्ही सेवापूर्तीकर्त्या शिक्षिकांच्या कार्याचा गौरव केला.

सहशिक्षक हनुमंत माळी यांनी सुनंदा माळी यांचा तर शिक्षिका विमल मुदाळे यांनी मीरा यादव यांचा जीवनप्रवास शब्दबद्ध केला. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिलीप जाधव, अनिस संस्थेचे बाबा हालकुडे, पत्रकार विकास गाढवे व बाळासाहेब चिवडे यांनीही मनोगत व्यक्त केले. सहशिक्षक व्यंकट काळे यांनी स्वागतगीत सादर केले. पहिलीची विद्यार्थिनी काव्या गोरे हिने माळी यांच्यावर कविता सादर केली. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षिका, नातेवाईक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक हेमंत जोशी यांनी केले. सूत्रसंचालन बाजीराव कोळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन केंद्रीय मुख्याध्यापक अंगद कांबळे यांनी केले.

Post a Comment

0 Comments