भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी तरुणांना मोफत प्रशिक्षणाची सुवर्णसंधी
लातूर :(जिमाका)दि. 20 - भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना संयुक्त संरक्षण सेवा (सीडीएस) परीक्षेची तयारी करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे नवयुवक आणि नवयुवतींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध आहे. नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड येथे 16 जून 2025 ते 29 ऑगस्ट 2025 या कालावधीत सीडीएस कोर्स क्र. 65 आयोजित करण्यात येत आहे. या कोर्सदरम्यान प्रशिक्षणार्थींना मोफत प्रशिक्षण, निवास आणि भोजन सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
लातूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी 10 जून 2025 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लातूर येथे मुलाखतीसाठी हजर रहावे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सैनिक कल्याण पुणे यांच्या संकेतस्थळावरून (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून) सीडीएस-65 कोर्सचे प्रवेशपत्र आणि त्यासोबत असलेल्या परिशिष्टांची प्रिंट भरून सोबत आणावी. प्रवेशासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा आणि त्याने लोकसेवा आयोग (UPSC), नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सीडीएस परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज केलेला असावा. यासोबतच संबंधित पात्रता प्रमाणपत्रही आणणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड यांच्याशी ईमेल (training.pctcnashik@gmail.com), दूरध्वनी (0253-2451032) किंवा व्हॉट्सअॅप (9156073306) द्वारे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद प्रकाश पांढरे (निवृत्त) यांनी केले आहे.
0 Comments