चित्त थरारक प्रात्यक्षिकांनी दहा दिवसीय तायक्वांदो स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर संपन्न.
लातूर : दि. 15 जून लातूर महानगरपालिका व तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूर यांच्या वतीने मनपा शाळा क्रमांक 11 येथे मनपा उपायुक्त डॉक्टर पंजाबराव खानसुळे यांच्या संकल्पनेतून दिनांक 05 जून रोजी सुरू करण्यात आलेल्या तायक्वांदो स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचा आज दिनांक 15 जून रोजी मुख्याध्यापक वैभव बोंदर यांच्या उपस्थितीत चित्त थरारक प्रात्यक्षिकांनी समारोप करण्यात आला.
महानगरपालिकेतील शाळेत विविध क्रियाशील उपक्रमाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले मनपा उपायुक्त डॉक्टर पंजाबराव खानसुळे व मनपा शिक्षण विभाग प्रमुख सौ नागणे यांच्या संकल्पनेतून मनपा विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीशी लढता यावे व विद्यार्थी स्वयंसिद्ध व्हावे या हेतूने दहा दिवसीय तायक्वांदो प्रशिक्षण शिबिराचे लातूर मनपा व तायक्वांदो असोसिएशन यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
दहा दिवस चाललेल्या या तायक्वांदो स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरात विद्यार्थ्यांना आशियाई तायक्वांदो प्रशिक्षक तथा राष्ट्रीय पंच मास्टर नेताजी जाधव, मास्टर धनश्री मदने व मास्टर जान्हवी मदने यांनी तायक्वांदो मार्शल आर्ट प्रशिक्षण दिले तर मनपा शाळेच्या वतीने दहा दिवस नियमित पोषक आहार, फळे व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या शिबिरात प्रशिक्षित झालेल्या विद्यार्थ्यांनी हाताने, पायाने व डोक्याने फरशा फोडून प्रशिक्षणात देण्यात आलेले धाडस, साहस, आत्मविश्वास, निर्भयता व असाधारण ताकदीचा प्रत्यय उपस्थितांना आणून दिला.
या प्रशिक्षण शिबिराच्या आयोजनात मनपा शाळा क्रमांक 11 चे शिक्षक देवराज लंगोटे, ईश्वरप्रसाद मांडे, सौ अनिता गुजे व भुतकर ताई यांनी हिरीरीने भाग घेतला होता.
0 Comments