Latest News

6/recent/ticker-posts

लातूरकरांच्या मनाचा ठाव घेणारे अनोखे पथक; मूकशक्तीचा विसर्जन मिरवणुकीत घुमला आवाज

लातूरकरांच्या मनाचा ठाव घेणारे अनोखे पथक; मूकशक्तीचा विसर्जन मिरवणुकीत घुमला आवाज


लातूर : "यंदा आवाज कानावर नव्हे तर मनावर" या थीमवर आधारित अनोख्या पद्धतीने लातूरातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल पथकाद्वारे आपली कला सादर केली. शब्द न उच्चारता आणि आवाज न ऐकू येत असूनही या मुलांनी ठेका धरून मिरवणुकीत दमदार सादरीकरण केले.

बाप्पा गणेश मंडळ आणि जीवन विकास प्रतिष्ठान संचलित ॲड. विजयगोपाल अग्रवाल मूकबधिर विद्यालयातील तब्बल २५ विद्यार्थ्यांच्या दिव्यांग चमूने शनिवारी झालेल्या विसर्जन मिरवणुकीत ढोल वादन करत उपस्थितांची मने जिंकली. गंजगोलाईतून निघालेल्या मिरवणुकीत गोलाई, भुसार लाईन, सुभाष चौक, दयाराम रोड आदी मार्गांवर या मूक-बधिर विद्यार्थ्यांनी ठेका धरला.

या अनोख्या पथकाला क्रीडा शिक्षक महेश पाळणे, नंदकुमार थडकर, बाप्पा गणेश मंडळाचे ढोल पथक प्रमुख विनय कलशेट्टी, अभिषेक राजपूत, शार्दूल ईटकर, आलोक वलाकट्टे, ऋषिकेश लांडगे, आदित्य कांबळे, अभय ढगे यांचे मार्गदर्शन मिळाले. समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवशटवार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, तत्कालीन जिल्हा माहिती अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, जिल्हा सक्षमीकरण अधिकारी राजू गायकवाड, सहाय्यक सल्लागार बालासाहेब वाकडे, जीवन विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयसिंहराव देशमुख, रामानुज रांदड, अभय शहा, जयप्रकाश अग्रवाल, संजय निलेगावकर, बाप्पा गणेश मंडळाचे अध्यक्ष आशिष महिंद्रकर, मार्गदर्शक आनंद राचट्टे, प्राचार्य संतोष देशमुख व श्रीकृष्ण लाटे यांनी विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक केले.

दीड महिन्यांचा खास सराव

गेल्या दीड महिन्यापासून या विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेऊन विसर्जन मिरवणुकीसाठी सराव केला होता. विद्यालयातील शिक्षक आणि बाप्पा गणेश मंडळाच्या ढोल पथकाने सांकेतिक भाषेत मार्गदर्शन करून या मुलांना ताल शिकवला. कानावर आवाज पोहोचत नसताना हाताच्या इशाऱ्यावर ताल साधणारा हा उपक्रम मराठवाड्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या ढोल पथकाचा पहिलाच प्रयोग ठरला आणि तो यशस्वी झाला.

Post a Comment

0 Comments