Latest News

6/recent/ticker-posts

मुस्लिमांनी ईदची नमाज स्वतःचे घरीच अदा करावी

मुस्लिमांनी ईदची नमाज स्वतःचे घरीच अदा करावी


रमजानच्या खर्चातली मोठी रक्कम मुस्लिमांनी मुख्यमंत्री फंडास दान करावी सादिक खाटीक यांचे आवाहन 



आटपाडी:(प्रतिनिधी) कोरोणा संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील मुस्लीम बांधवांनी रमजान सणाच्या खर्चातली मोठी रक्कम मुख्यमंत्री फंडात जमा करून मानवतेचे ,त्यागाचे नेक काम करावे. तसेच रमजान ईदची नमाज स्वतःचे घरीच अदा करून कोरोणाविरूध्दच्या लढाईत मोठे योगदान दयावे असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक आटपाड़ी यांनी केले आहे. जगभर आलेल्या कोरोणा संसर्गाच्या महामारीने संपूर्ण जगाला वेढले आहे.शंभराहून अधिक देश या संकटाशी सर्व शक्तीनिशी लढत आहेत, जगभरात ३ लाखाहून अधिक माणसांचे प्राण घेतलेल्या कोरोणामुळे जगभरात ४८ लाखाहून अधिक रूग्ण बाधीत आहेत. भारतात रुग्णसंख्या लाखावर पोहचलेल्या या कोरोणा आजाराने दोन महिन्यापासून भारताला वेठीस धरले आहे . संपूर्ण जनजीवन ठप्प झाल्याने करोडो कष्टकरी, रोजंदारीतलेल्यांचे मोठे हाल सुरू आहेत. हजारो गोरगरीब आपआपल्या गावी जाण्यासाठी अन्न ,पाण्याची वानवा असताना तळपत्या उन्हात शेकडो किलोमीटर चालत असल्याचे दृश्य मन पिळवटून टाकणारे आहे. कोरोणा रूग्णांना वाचविण्यासाठी देशातले लाखो डॉक्टर , वैद्यकीय क्षेत्रातले सर्व कर्मचारी , स्वच्छता कर्मचारी , दिवस रात्र ड्यूटी बजावणारे पोलीस , होमगार्ड, मदतीतले शिक्षक ,शिक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस,, प्रशासनातले अधिकारी, कर्मचारी, नेतेमंडळी, समाजसेवक, पत्रकार इत्यादी समाजातले अनेक घटक जीवघेणा संघर्ष करताहेत या भीषण संकटाच्या स्थितीस अनुसरून देशातली सर्व धर्मीय प्रार्थनास्थळेही बंद ठेवण्यात आली आहेत. या दोन महिन्याच्या कालावधीत आलेल्या महामानवांच्या जयंती , पुण्यतिथी, सण , वार , उत्सव अत्यंत साधेपणाने आपल्या घरी राहून, घरातच साजरे करून लाखो बांधवांनी कोराणा विरूध्दच्या लढाईत मोलाची भूमिका बजावली आहे. अशा पार्श्वभूमीवर मुस्लीमांचा पवित्र रमजानचा महिना संपत आला असून सोमवार दि .२५ मे रोजी रमजान ईद आहे. संपूर्ण महिनाभराचे रमजानचे रोजे,सहेरी ,इप्तारी ,नमाज ,तराबी घरी राहूनच अत्यंत सादगीने साजरा करणाऱ्या मुस्लीम बांधवांनी रमजान ईदची नमाज ईदगाह अथवा मशिदीत न जाता आपल्या घरीच अदा करून कोरोणाविरूध्दच्या आपल्या सर्वांच्या हिताच्या लढाईत मोलाचे योगदान दयावे असे आवाहन त्यांनी केले. कोरोणा महामारीच्या लॉक डाऊनमुळे मोठा आर्थीक फटका बसलेले लाखो बांधव गेल्या काही दिवसांपासून हताश आहेत . देशातले व्यापार,व्यवसाय ,उदयोगांचे झालेले नुकसान पैशात माेजता येणार नाही इतके प्रचंड आहे . लाखो बांधवांना अतिशय कठीण अवस्थेत पुढच्या कालावधीत सामोरे जावे लागणार आहे . ही भयावह ,हृदय पिळवटून टाकणारी वस्तुस्थिती आहे, येत्या सोमवारी संपूर्ण जगभर साजरा होणाऱ्या पवित्र रमजान ईद या सर्वोच्च त्याग, तपाचा संदेश देणाऱ्या या सणाच्या पार्श्वभूमीवर तमाम मुस्लीम बांधव दान देतच असतात. रमजान ईदच्या निमित्ताने जकात, फितरा च्या माध्यमातून गरजु समाज बांधवांना दान दिले जाते . तथापि यावेळच्या भयावह कोरोणा संकटाच्या स्थितीने लाखो बांधव संकटात सापडले आहेत. रमजान ईदच्या एकूण खर्चातली मोठी रककम मुख्यमंत्री फंडात जमा करावी. ज्यायोगे कोरोणा महामारी विरूध्द लढत असलेल्या सर्वच कोवीड योध्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत होवू शकेल. तसेच शक्य असल्यास मास्क ,सॅनिटायझर, पीपीई कीट, औषधे ,अन्न धान्य अशा माध्यमातून ही मुस्लीमांनी आवश्यक दान शासन दरबारी जमा करावे . उन्हातान्हांत घराच्या ओढीने अन्न पाण्याविना शेकडो किलोमीटर चालत निघालेल्या आपल्याच बांधवांना अन्न , पाणी, आवश्यक ती वैद्यकीय मदत करून इन्सानियत अधिकाधिक दृढ करावी . तसेच घराच्या चारी दिशांना असणाऱ्या शेजारी, पाजारी दीन,दुबळे ,उपेक्षित , गरजूंना यथाशक्ती मदत करून रमजानचे महात्म्य वाढीस लावावे .पवित्र रमजानची नमाज घरीच अदा करीत रमजान सण अत्यंत साधेपणाने साजरा करावा असेही आवाहन शेवटी सादिक खाटीक यांनी केले आहे .


Post a Comment

0 Comments