बायोमेट्रिक हजेरी पद्धत रद्द करणेबाबत एमसीआयकडे आग्रह धरु - वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
लातूर:(प्रतिनिधी) दि.२३ कोविड-१९ विषाणुचा प्रादुर्भाव वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापक (डॉक्टर) आणि अन्य कर्मचाऱ्यांना होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बायोमेट्रिक हजेरी पद्धत रद्द करण्याचा आग्रह भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडे (एमसीआय) धरण्यात येईल आणि दरम्यानच्या काळात राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमधून हजेरीपटाद्वारे हजेरी घेण्यात यावी असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिकद्वारे हजेरी घेण्यात यावी अशा सूचना भारतीय आयुर्विज्ञान परिषदने (एम सी आय) अलीकडेच दिल्या होत्या मात्र सध्याची परिस्थिती पाहता अध्यापक तसेच कर्मचारी यांच्यासाठी हजेरीपटाद्वारे हजेरी घेणेच सुरक्षित असल्याने बायोमेट्रिक पद्धतीने घेण्यात येणाऱ्या हजेरीचा पुनर्विचार करण्याबाबत वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाकडून भारतीय आयुर्विज्ञान परिषदेला कळविण्यात यावे तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपस्थिती नोंदविण्यासाठी लवकरच फेसरीडर बसविण्याच्या सूचनाही वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या सचिवांना अमित देशमुख यांनी दिल्या आहेत.बायोमेट्रिकमुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो हे लक्षात घेऊन केंद्र व राज्य शासनाने आदेश काढून बायोमेट्रिक हजेरी बंद केली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यलयातही ही पद्धत वापरणे योग्य ठरणार नाही असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
0 Comments