Latest News

6/recent/ticker-posts

ठाणे,पुणे मनपाच्याच्या धर्तीवर अकोला महापालिकेत ही अतिरिक्त सनदी अधिकारी नेमा - राजेंद्र पातोडे.

ठाणे,पुणे मनपाच्याच्या धर्तीवर अकोला महापालिकेत ही अतिरिक्त सनदी अधिकारी नेमा - राजेंद्र पातोडे. 



अकोला:(प्रतिनिधी) दि. २४ - कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ठाणे महापालिकेत तीन सनदी अधिकाऱ्यांची अतिरिक्त व सहायक आयुक्त पदी नेमणूक करण्यात आली आहे. त्याच प्रकारे अकोला मनपा क्षेत्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने अकोला महापालिकेत ही अतिरिक्त सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.अकोल्यात पॉझिटिव्ह रुग्णाचा आकडा ३८७ वर पोहचला असून तो वाढतच आहे. त्यामध्ये सर्वाधिक रूग्ण हे अकोला महापालिका क्षेत्रात आहेत. विशेष म्हणजे शहरातील बहुतांश भागात रूग्ण सापडत असल्याने अकोला महापालिका रेड झोन मध्ये आली आहे. यावर मात करण्यासाठी जिल्हा व महापालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. जिल्हा व महापालिका प्रशासनात समन्वय नसल्याने शहरातील ही परिस्थिती दिवसागणिक बिकट होत चालली आहे. राज्यासह अकोल्यात ५० दिवसापेक्षा जास्त संचारबंदी असूनही परिस्थिती नियंत्रणात आणणे शक्य झालेले नाही. कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी रणजित कुमार या सनदी अधिका-याची तात्पुरती नियुक्ती केली आहे. त्यापुर्वी संजय हेरवडे व गणेश देशमुख यांना अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पुणे महापालिकेतही अश्याच प्रकारे अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. अश्याच अधिकाऱ्यांची गरज अकोला महापालिकेला आहे. लॉकडाऊनच्या काळात वाढणारे रूग्ण व पुढे येणाऱ्या पावसाचे दिवस पाहता परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. शिवाय महापालिकेत अधिकारी,कर्मचाऱ्यांची संख्या ही कमी अाहे. सफाई कर्मचारी व इतर कर्मचारी यांना संरक्षण कीट, मास्क तसेच फेस सिल्ड या सारखी साधने देखील देण्यात आलेली नाहीत.अकोला महानगर पालिकेचा हलगर्जी पणा सांगायचे झाल्यास, येथील अधिकारी किती बेजबाबदार आहेत हे यावरून दिसून येते. काही दिवसांपूर्वीच टेलिकॉम कंपनीने अवैध पध्दतीने केबल टाकल्या होत्या. त्यावर मनपाने कारवाई देखील केली. मात्र कोरोना काळात केबल दुरुस्तीच्या नावाखाली तोडलेल्या बेकायदा केबल पुन्हा जोडण्यात आल्या.यावर मात्र पालिकेने कोणत्याही प्रकारे कारवाई केली नाही. यावरून पालिकेचा भोंगळ कारभार उघड दिसतोय, या बेजबाबदार पणामुळेच अकोल्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळेच या ठिकाणी ठाणे आणि पुण्याच्या धर्तीवर नवीन सनदी अधिकाऱ्याची नेमणूक करावी, जेणे करून हे अधिकारी केवळ कोरोनाला पायबंद घालण्यासाठी काम करतील. अशी मागणी राजेंद्र पातोडे यांनी केली आहे. राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी ही माहिती दिली.


Post a Comment

0 Comments