Latest News

6/recent/ticker-posts

उदगीरात कोविड १९ चा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी युध्दपातळीवर एकात्मिक उपाययोजना राबवाव्यात- अमित देशमुख

उदगीरात कोविड १९ चा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी युध्दपातळीवर एकात्मिक उपाययोजना राबवाव्यात- अमित देशमुख


लातूर:( प्रतिनिधी) उदगीर शहरात कोविड १९ चा प्रादूर्भाव वाढणार नाही यासाठी यंत्रणांनी सजग राहून युद्धपातळीवर सर्व उपाय योजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.
    पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन,संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांचेसह अतिरिक्त जिल्हाधिकारी अविनाश पाठक, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ढगे, तहसीलदार, श्री. मुंडे, नपचे मुख्याधिकारी यांच्यासह उदगीरशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची झूम अँप वरून आढावा बैठक घेतली. 
    बैठकीच्या प्रारंभी पालकमंत्री देशमुख यांनी उदगीरच्या २१ कोविड-१९ बाधित रुग्णांची प्रकृती कशी आहे, त्यांच्यात कोणाला कोविड-१९ लक्षणे आहेत का, एकूण २१ रुग्णात महिला, पुरुष, जेष्ठ नागरिक, लहान मुले किती यासंबंधीचा तपशील कसा आहे. बाधितांमध्ये एकुण किती कुटुंबे आहेत, किती शेजारी, नातेवाईकां यांना लागण झाली  आहे, बाधितांमध्ये परजिल्हा, परराज्यातून आलेले प्रवाशी किती आहेत त्यांच्या संपर्कातील कितीजण आहेत, ज्यांचा सोर्स कळत नाहीत असे कितीजण आहेत आदी प्रकारची तपशिलवार माहिती जाणून घेतली. 
कृती कार्यक्रम तयार करावा
      एकुण सद्यपरिस्थिती जाणून घेतल्यानंतर उदगीर शहरातील कोविड १९ चा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजनांचे एकात्मिक व्यवस्थापन करावे असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले. नियम तयार होत आहेत, आदेश निघत आहेत, परंतु त्या आदेशाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते की नाही याचा आढावा यापुढे घेतला जावा अशीही सूचना करून राज्यमंत्री संजय बनसोडे स्वतः या परिस्थीतीवर लक्ष ठेवून राहतील असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.
    पालिका कर्मचारी, महसूल व शासनाच्या इतर विभागातील कर्मचारी, पोलिस यांची एकत्रित संयुक्त पथके नियुक्त करावीत. जिल्हाधिकाऱ्यांनी पथकांची संख्या आणि त्यातील सदस्य संख्या शहराच्या क्षमतेनुसार ठरवावी. सर्व पथकांना शहराचे मुख्य मार्ग, प्रभाग, अंतर्गत रहदारीचे रस्ते विभागून द्यावेत, ज्यामुळे रस्त्यावर पथकांची गर्दी होणार नाही. पथकांनी फिजकल डिस्टन्सिंग पालन करावे, शासन, प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना व इतर निर्देशांचे पालन करावे, सूचनांचे पालन होते की नाही हे तपासण्यासाठी एक वेगळी यंत्रणा तयार करावी, काही फिरती पोलीस पथकेही नेमवीत, जी मुख्य रस्त्यावर सतत सूचना करीत राहतील अशा सुचनाही पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी केल्या आहेत.


Post a Comment

0 Comments