Latest News

6/recent/ticker-posts

आम आदमी पार्टीचे आज राज्यभरात 'वीजबिल माफ करा' आंदोलन

आम आदमी पार्टीचे आज राज्यभरात 'वीजबिल माफ करा' आंदोलन


मुंबई: कोविड-१९ च्या संकटामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थती बिकट बनली आहे. या परिस्थती मध्ये त्यांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे बनलेले आहे.केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २० लाख कोटीच्या पॅकेजमध्ये सामान्य माणसाला कोणतीही थेट मदत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने आता त्वरित राज्यातील नागरिकांचा आर्थिक ताण हलका करण्याच्या दृष्टीने पावले उचलून त्यांना दिलासा देणे गरजेचे बनले आहे.कोरोना साथीच्या या भीषण संकटाच्या काळात सर्वत्र रोजगार बंद झाले आहेत. नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे, त्यामुळे लॉकडाऊन काळातील नागरिकांचे २०० युनिटपर्यंत मागील ४ महिन्याचे वीजबिल पूर्णपणे माफ करावे या मागणीसाठी आम आदमी पक्ष महाराष्ट्राच्या वतीने आज दि. ३ जून रोजी राज्यभर आंदोलन करण्यात आले.राज्यात लॉक डाऊन असलेल्या भागात ईमेलने तर शिथिल केलेल्या तालुका व सर्व जिल्ह्यांत आम आदमी पक्षाच्या स्थानिक शिष्टमंडळाने २०० युनिट वीजबिल माफीचे निवेदन जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयात दिली. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे व वीज मंत्री नितीन राऊत यांना ईमेलने निवेदन देऊन कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वीज बिल माफ करण्याची मागणी करण्यात आली तसेच याबाबत चर्चा करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या राज्यस्तरीय शिष्टमंडळाची मुख्यमंत्री व वीज मंत्री यांच्यासोबत बैठकीच्या वेळेची मागणी करण्यात आली. कोरोनाच्या संकटात भर घालणाऱ्या निसर्ग चक्रीवादळामुळे जनतेचे अजून जास्त नुकसान अपेक्षित असल्यामूळे आपने केलेल्या मागणीला जोर मिळाला आहे. आजच्या आंदोलनाला विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई व कोंकण विभागातील जनतेचा उस्फुर्त पाठिंबा लाभला आणि सहभाग घेतला. या आंदोलनात आम आदमी पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सामील झाले.राज्याच्या सर्व भागातील शेतकरी, श्रमिक, रिक्षा चालक, घरकामगार महिला, विद्यार्थी, कनिष्ठ मध्यम वर्गीय असे समाजाच्या विविध स्तरांतील सर्वसामान्य जनतेने या मागणीला समर्थन देणारे शेकडो व्हिडिओ बनवून दिले. या सर्व वीज ग्राहकांच्या भावना अधोरेखित करणारे मेसेज, व्हिडीओ स्वरुपातील सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया आम आदमी पक्षाद्वारे प्रकाशित करून ते सोशल मीडियाद्वारे सरकारपर्यंत पोहचवण्यात आले आहे.सोशल मिडियाद्वारे व्हिडीओ प्रकाशित करून वीजबिल माफ करा हा हॅशटॅग सर्वत्र चालवला गेला.त्याला समाज माध्यमातून उस्फुर्त प्रतिसाद व पाठिंबा लाभला. ट्विटर वर हा राज्यात टॉप ५ वा ट्रेण्ड राहिला. दिल्ली येथील अरविंद केजरीवाल सरकार मागील दोन वर्षांपासून २०० युनिट पर्यंत वीज मोफत देत आहे. त्याचा दिल्लीवासीयांना मोठा दिलासा मिळत आहे. आज रोजी देशातील सर्वाधिक महाग वीज महाराष्ट्रात आहे तसेच कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रालाच बसला आहे. हे लक्षात घेता आम आदमी पक्षाच्या दिल्ली सरकारपासून बोध घेऊन किमान लॉकडाऊन काळातील चार महिन्यांचे २०० युनिट पर्यंतचे वीज बिल महाराष्ट्र राज्य सरकारने माफ केल्यास राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळणार असल्यामुळे 'आप'च्या वतीने ही मागणी लावून धरण्यात येणार आहे.


Post a Comment

0 Comments