Latest News

6/recent/ticker-posts

--लेख---> समाजाला नव विचार देणारा कादंबरीकार- अण्णाभाऊ    

समाजाला नव विचार देणारा कादंबरीकार- अण्णाभाऊ



धुनिक मराठी साहित्यामध्ये आजपर्यंत अनेक विचारप्रवाह आणि साहित्यप्रवाह उदयास आले. अशा प्रवाहाने मराठी साहित्याला अनुभवाचा मोठा वारसा देऊन समृद्ध केले आहे. पण ज्यांच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य असताना... कसलाही सांस्कृतिक व विद्वत्तेचा तसेच परिवर्तनाचा वारसा नसताना... अवघ्या दीड दिवस शाळेत जाऊन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्यामध्ये आपल्या लेखणीच्या रूपाने वास्तववादी जीवनानुभवाचं मोठं विश्व लेखनाच्या माध्यमातून आपल्यासमोर साकारलेलं आहे. आपल्या लेखणीच्या बळावर सामान्यातील सामान्य माणसाला आपल्या साहित्याचा नायक करून... हा महापुरुष साहित्य विश्वात भल्याभल्या प्रस्थापित साहित्यिकात आपले नाव कमावतो. आपल्या अनुभवाच्या जोरावर पुढे साहित्यसम्राट... बहुजन चळवळीचे नायक होतो. आणि त्यांचे एकूण साहित्य आधुनिक समाज आणि साहित्यामध्ये मोठं परिवर्तन आणि क्रांती करणारे ठरले आहे. हा त्यांचा साहित्यिक क्रांतीचा इतिहास आपल्या देशाबरोबर जगाला कल्याणकारी मानवतेच्या परिवर्तनाचा वारसा सांगणारा आहे. त्यांच्या सर्वच साहित्यामधून मानवतावादी मूल्य जगासमोर आदर्श म्हणून ठरले आहेत.


        लहानपणापासून अण्णाभाऊंना दांडपट्टा चालवणे ,डोंगरात फिरणे ,मैदानी खेळ खेळणे, गावोगावच्या जत्रेला हजर राहणे, कु-हाड चालविणे,कबुतर पाळणे, तीर कमठ्यांनी पक्षी मारणे हे छंद होते. या सर्व अनुभवातून अण्णाभाऊ पुढे लिहु लागले.


         १९४९ साली त्यांनी "मशाल" या साप्ताहिकात श्रीकृष्ण पोवळे या संपादकानी 'माझी दिवाळी' ही वास्तवतेवर आधारित कथा लिहिली. ही कथा प्रख्यात साहित्यीक प्र.के अत्रे यांनी वाचली व अण्णाभाऊंची पाठ थोपटली, तिथूनच पुढे अण्णाभाऊंना लिखाणाची प्रेरणा मिळाली.


       पुढे अण्णाभाऊंनी मराठीतील कथा,नाटक,कांदबरी,आत्मचरित्र,पोवाडे,लावण्या,प्रवासवर्णन, छक्कड, असे सर्व साहित्य प्रकार हाताळले. त्यांना त्यांच्या लेखनीच्या बळावर त्यांच्या 'फकीरा ' या कादंबरीस "साहित्य अकादमीचा" मानाचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या साहित्यातील नायिका मांग ,रामोशी,दरोडेखोर,भटके, डोंबारी ,कंजारी,कोल्हाटी आहेत .


       अण्णाभाऊंनी ३५ कांदब-या, चित्रपट कथा १२, लोकनाट्य १४, कथासंग्रह २२, नाटक १, वगनाट्य १५, पोवाडे १०, प्रवासवर्णन १, एवढी साहित्य रचना त्यांनी लिहली आहे. पण येथल्या पांढरपेशी साहित्यांकांनी त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष पदाचा मान मिळु दिला नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल .


      त्यांच्या कादंबरीतून सर्व मानव जातीचा व अन्याय, अत्याचार,चारित्र्य,यासंबंधीचा विचार मांडलेला आहे. आज अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर विविध विद्यापीठात त्यांचा अभ्यासक्रम ठेवलेला आहे. आज त्यांच्या साहित्यावर माझ्या सारखे कितीतरी प्राध्यापक संशोधन, अभ्यास करीत आहेत. म्हणून अण्णाभाऊ एका जातीचे ठरु शकत नाहीत. त्यांचे साहित्य मानवतेची पूजा करनारे साहित्य आहे .म्हणून अण्णाभाऊंना जात म्हणून न स्विकारता एक विचार म्हणून, एक कम्युनिस्ट ,व आंबेडकर वादी म्हणून स्विकारले पाहिजे.



     अण्णाभाऊंनी त्यांच्या संबंध साहित्यातून अखिल मानव जातीचा दिन, दलित, शोषित, पिडीत, विधवा, डोंबारी मांग, कोल्हाटी, कंजारी समाजाचा विचार मांडलेला आहे.


      ' चित्रा ' ही १९५४ साली प्रकाशित झाली चित्रा ही विधवा स्त्री असते. अनेकांच्या नजरा चुकऊन ती निष्कलंक जीवन जगत असते.


    'आबी' या कादंबरीत स्त्रीने न डगमगता कसे खंबीर जीवन जगावे हे सांगितले आहे. 


      'माहेरची वाट' या कादंबरीत 'सयाजी 'दुश्मनाची मुलगी रात्रभर आपल्या घरी ठेवून तिची ईज्जत स्वतःच्या मुलीसारखी जपतो. तिच्यावर अत्याचार करना-या गणुकाकाला गोळी घालून ठार करतो.


     'वारणेचा वाघ' ही कांदबरी १९५१ साली प्रकाशित झाली. या कादंबरीतील सत्तु नावाचे पात्र स्त्रियांचे संरक्षण करुन समाजाला निती शिकवते.


     'वैर' ही कादंबरी १९६४ मध्ये प्रकाशित झाली. या कादंबरीत एका गावातील माणसाने कुटुंबातील व्यक्तीसारखे वागावे असे सांगते. ही कादंबरी म्हणजे संघर्षाची कहाणी आहे. मुकिंदा आणि देशमुख यांच्या दोन घराण्यातील पिढ्यांन् पिढ्यांपासून चालत आलेला वाद आहे.


    'वैजंयता' ही कादंबरी १९६३ मध्ये प्रकाशित झाली. ही कांदबरी तमाशावर आधारित आहे. 'गजरा'ही वैजंयताची आई आहे. ती नृतिका(नाचनारी)असते. आपल्या मुलीच्या म्हणजे वैजंयताच्या वाट्याला हे असे जीवन येऊ नये, असे गजराला वाटते.


      'माकडीचा माळ' डवरी गोसावी,फासेपारधी,शिकलकरी,माकडवाले,अशा भटक्या लोकांची कहाणी या कादंबरीत आहे. यंकु माकडवाला त्याची मुलगी दुर्गा, माकड मंग्या आणि माकडीन रंगु, यंकुची मुलगी दुर्गा ही यम्याबरोबर प्रेम करते. गावोगावी फिरणारी माणसे सुध्दा किती चारित्र्यसंपन्न असतात, असा विचार या कादंबरीत मांडला आहे.


   'आवडी' ही कादंबरी विषमतेवर आधारित आहे. आवडी ही तांदुळवाडीच्या तात्त्याबा चौगुल्याची तरुण मुलगी ती धनाजी नावाच्या एका रामोशाच्या तरुण मुलाच्या प्रेमात पडते. आवडी सारख्या एका खानदानी मुलीने धनाजी सारख्या एका रामोश्याशी प्रेम करावे हे नागुला विलक्षण अपमानास्पद वाटते. आणि म्हणून आवडीचे लग्न जातीतल्याच भगवंतराव पाटलाच्या मुलाशी करुन दिले जाते. त्याला फेपरे येते. फेपरे येणा-या नवरा सोडून ती पळ काढते आणि घरी आल्यामुळे नागु तिचा खून करतो. याचा राग धनाजीला येतो तोही त्याचा बदला घेतो.


     'अलगुज' या कादंबरीत खून, मारामा-या आहेत '. नांदगावच्या गणु मोहित्याची रंगु ही मुलगी बापुवर प्रेम करते. परंतु हणमा पाटील रंगु आणि बापु यांच्या प्रेमात विघ्न आणतो. तो त्यांच्या मुलासाठी लक्षासाठी रंगुला गणु मोहीत्याकडे मागणी घालतो. परंतु गणु लेकीचा कल बघून त्याच्या मागणीला नकार देतो. त्याचा राग हणमा पाटलाला येतो. त्यातून भांडण वाढते. आणि पुढील सा-या घटना घडत जातात. फौजदारचं स्वतःरंगु आणि बापु यांच्या लग्नासाठी पुढाकार घेतो.


     'पाझर' ही कादंबरी १९६५ मध्ये प्रकाशित झाली. या कादंबरीत खून मारामा-या चित्रित झालेल्या आहेत. ही पारगावचा नाईक आणि पाटील या दोन घराण्यातील भांडणाची कथा आहे.


     'फकीरा' ही कादंबरी १९५९ साली प्रकाशित झाली. ही कादंबरी अण्णाभाऊनी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीस अर्पण केली आहे. या कादंबरीस साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. ही खूप गाजलेली कादंबरी आहे. या कादंबरीचा नायक राणोजी असतो. वाटेगावचा पाटील जेव्हा दु:ख व्यक्त करतो, तेव्हा त्या दु:खाचे निवारण करण्यासाठी राणोजी एकटा लढा देण्यास तयार होतो. आणि शिगावची जोगणी आणतेवेळी तो शहिद होतो.


    अण्णा भाऊ यांच्या संबंध साहित्यात निळ्यामांग,सावळ्यामांग,किशा,बळी मुरारी,फकीरा,त्याचा भाऊ साधु ,ईश्वर,चिंचणीकर पिराजी,साजुरकर निळाजी,असी बहादुर ,पराक्रमी ,धाडसी माणसे आहेत.


       त्यांच्या साहित्यातील स्त्रिया निधड्या छातीच्या,निर्भय,बेडर,ताकदवान,चारित्र्यसंपन्न,शिलवान,निडर बेडर,धाडसी,नितीमान आहेत. अण्णा भाऊ म्हणतात "मी ज्यांच्याविषयी लिहतो ती माणसे माझी आहेत. याचे भान ठेऊन मला लिहावे लागते".


      म्हणून प्र.के.अत्रे म्हणतात ,"ही जगण्यासाठी लढना-या,माणसांची कथा आहे "


अण्णाभाऊच्या साहित्यांची जगातल्या १३भाषेत भाषांतर झाली आहेत. असा हा थोर लेखक,विचारवंत होता. अण्णाभाऊंची माणसे नशिबावर हवाला ठेऊन बसत नाहीत. लाचाराप्रमाणे जीवन जगणे त्यांना मान्य नाही. त्यांची माणसे भुकेने कंगाल असले तरी, भाकरीसाठी व पैशासाठी लाचार होत नाहीत. तर नितीसाठी व स्त्रियांच्या संरक्षणासाठी स्वतःचे बलिदान देतात.


पोटातील 'आग' हा त्यांच्या कादंबरीचा आत्मा आहे.अन्याय,अत्याचार,व शोषण या विरुद्ध अण्णाभाऊंची माणसे दंड थोपटून उभे राहतात. अण्णाभाऊ साठे आपल्या साहित्यातील स्त्रियांना म्हणतात,"अब्रूला जपा ,स्वाभिमानाने जगा,नितीमत्तेला सांभाळा,दुबळेपणाने राहु नका,भिऊ नका,परंपरंचे जोखड फेकून द्या,अब्रूला जीवापाड जपा आणि अब्रुघेणा-याला जाळून टाका .


     एवढा मोठा परिवर्तनवादी विचार अण्णाभाऊंनी आपणास त्यांच्या साहित्यातून दिला असुनही आम्ही आजही संगनक ,इंटरनेट,ट्युटर,फेसबुक,व्वाॅट्सॅपच्या युगात आम्ही अंधश्रध्दा,रुढी,परंपंरा,देवधर्म,यांना कवटाळून बसलो आहोत. जोपर्यंत आम्ही हे सर्व फेकून देणार नाही. तोपर्यंत आमची प्रगती होणार नाही.


        शेवटी जयंतीच्या निमित्ताने अण्णाभाऊंचे क्रांतिकारी विचार आत्मसात करावे. एवढे जरी जयंतीच्या निमित्ताने केलात , तरी जयंती केल्याचे सार्थक होईल. 


      शेवटी अण्णाभाऊ यांच्या झुंजार लेखणीस सलाम करुन मी थांबतो.


              प्रा.वैजनाथ सुरनर 


सदस्य- डाॅ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र शासन


E-mail: vaijnathsurnar@gmail.com 


Post a Comment

0 Comments