प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा लाभ घ्यावा
लातूर:(प्रतिनिधी) दि.12 - देशातील मत्स्योत्पादनामध्ये भरीव वाढ व्हावी आणि देशातील मच्छिमारांच्या हित संवर्धनासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (Pradhan Mantri Sampada Yojana-PMMSY)अंमलबजावणी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना लातूर जिल्हास्तरीय समितीची सभा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेची प्रमुख उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत. केंद्र शासनामार्फत मत्स्यव्यवसाय हा पुरक व अग्रक्रमीत व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे व याव्दारे भुजलाशयीन क्षेत्रातील सामाजिक व अर्थिक दृष्टया कमकुवत पारंपारीक मच्छिमारांचे / मत्स्यव्यवसायीकांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्याचे निश्चीत करण्यात आले आहे.शाश्वत आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत व रोजगार निर्मीतीच्या संधी निर्माण करणे, कृषि क्षेत्राच्या सकल मुल्यात वाढ करणे आणि निर्यातीत योगदान वाढविणे.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा कालावधी 2020-21 ते 2024-25 असा आहे. या कालावधी करीता केंद्र शासनाने एकूण रु. 20050/- कोटी गुंतवणूक करण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये केंद्र हिस्सा रु. 9407/- कोटी, राज्य हिस्सा रु. 4880/- कोटी आणि लाभार्थी हिस्सा रु. 5763/- कोटी या प्रमाणे नियोजन करण्यात आलेले आहे. या योजने अंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रकल्प किंमतीच्या 40 % (केंद्र हिस्सा 24 % व राज्य हिस्सा 16 % ) व अनुसूचित जाती/ जमाती/ महिला या प्रवर्गासाठी प्रकल्प किंमतीच्या 60 % (केंद्र हिस्सा 36 % व राज्य हिस्सा 24 %) या सुत्रा प्रमाणे अर्थसहाय्य मंजूर करण्याची तरतुद आहे. प्रकल्प किंमतीच्या अर्थसहाय्या व्यतिरिक्त उर्वरित रक्कम ही लाभार्थी हिस्सा असेल.
या योजने अंतर्गत लाभार्थीभिमूख भुजलाशयीन मत्स्यव्यवसायाच्या विकासाकरीता नविन तळी/ तलावांचे बांधकाम अस्तीत्वातील तळी/ तलावांचे नुतनीकरण, मत्स्य/ कोळंबी संवर्धनासाठी निविष्ठा वापरावर अनुदान , भारतीय प्रमुख कार्प व इतर संवर्धनायोग्य माशांच्या बीज उत्पादनासाठी मत्स्यबीज उत्पादन केंद्राची स्थापना करणे मासळी वाहतुकीतच्या पायाभूत सुविधेसाठी अर्थसहाय्य, शोभिवंत मासे संवर्धन व विक्री, मच्छिमारांना विमाछत्र, प्रशिक्षण कार्यक्रम बर्फ कारखाना, शीतरोधक वाहने, पुनर्चक्रीय पध्दतीने मत्स्यसंवर्धन आणि जैवपुंज पध्दतीने मत्स्यसंवर्धन इत्यादी प्रकारच्या योजनांचा समावेश आहे.
तरी सर्व मच्छिमार सहकारी संस्था, सभासद, मत्स्यसंवर्धक, मत्स्यकास्तकार यांनी जास्तीत जास्त योजनेचा लाभ घ्यावा. सदर योजनेची अधिक माहिती http://dof.gov.in.pmmsy या संकेतस्थळावर उपलब्ध् आहे. तसेच लातूर जिल्हयात प्रस्तूत योजने अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यास इच्छूक लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय , लातूर (जुने जिल्हाधिकारी कार्यालय परीसर, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, लातूर दुरध्वनी क्र. 02382-245195) येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, लातूर यांनी केले आहे.
0 Comments