लॉकडाऊनच्या काळात शालेय विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष
चाकुर:{ता.प्र.सलीमभाई तांबोळी} covid-19 या जीवघेण्या आजाराचा वाढता प्रभाव पाहता महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू असून या काळात संपूर्ण शाळा-महाविद्यालये बंद असल्या कारणाने शालेय विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले असून लहान शालेय विद्यार्थी अभ्यास सोडून रस्त्यावर धुळीत खेळण्यात मग्न झाले आहेत. तर मोठी मुले कानात हेडफोन घालून फिरण्यात व्यस्त असल्याचे ग्रामीण भागातील वास्तव चित्र दिसून येत आहे. दिवसेंदिवस covid-19 या जीवघेण्या रोगाची तीव्रता वाढताना दिसून येत असून शहरी भागासह ग्रामीण भागातही कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. ही वाढत असलेली रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनासह आरोग्य विभागही आटोकाट प्रयत्न करीत आहे. घरातच रहा, कामाशिवाय घराबाहेर पडू नका, नेहमी साबणाने हात स्वच्छ धुवा, पाणी नसेल तर वारंवार सॅनिटायझरने हात स्वच्छ करा, तोंडाला मास्क लावा, सामाजिक अंतर ठेवा असे प्रशासन वारंवार जनतेला सांगत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर हळद, ज्वारी काढण्यासह शेतीच्या कामात व्यस्त झाले आहेत. मात्र त्यांची पाल्ये शाळा, महाविद्यालये व खाजगी शिकवणी वर्ग बंद असल्या कारणाने काही विद्यार्थी अॉनलाईन शिकवणी वर्गाच्या माध्यमातून अभ्यास करीत आहेत. तर अॉनलाईनची व्यवस्था नसलेल्या बहुतांशी शालेय विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रमांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पालकांची नाहक डोकेदुखी वाढली आहे. कधी एकदाची covid-19 या जीवघेण्या आजाराची साथ संपते, आणि वाम मार्गाने भरकटत चाललेल्या व देशाचे भावी आधारस्तंभ असलेल्या विद्यार्थ्यांची पाऊले शाळेकडे वळतील, या रोगाच्या साथीमुळे माणसा-माणसात निर्माण झालेला दुरावा कधी संपेल ? पूर्वीसारखी हातात हात घालून गळाभेट कधी घेता येईल ? भारत देश सुजलाम् सुफलाम् कधी होईल ? 'आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे !' ह्या गाण्याची प्रचिती कधी येईल ? असे अनेक प्रश्न ग्रामस्थांनामधून ऐकावयास मिळत आहेत.

0 Comments