Latest News

6/recent/ticker-posts

एक हेक्टर केशर आंबा लागवडीने कामालपुरच्या कदमांनी केली उत्पादनात कमाल;सहा लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित

एक हेक्टर केशर आंबा लागवडीने कामालपुरच्या कदमांनी केली उत्पादनात कमाल;सहा लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित


बी डी उबाळे

औसा: वामनराव कदम हे मूळचे कमालपुर, ता.औसा जि. लातूर येथील रहिवासी असून सध्या ते अप्पर जिल्हाधिकारी तथा उपायुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद या पदावर कार्यरत आहेत. मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे त्यांनी कृषी पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागात पण काही काळ त्यांनी सेवा केलेली आहे. पहिल्यापासूनच त्यांना शेतीची आवड होती. उच्च पदावर कार्यरत असून सुद्धा त्यांना शेतीची ओढ काही गप्प बसू देत नव्हती. कृषी विभागाच्या सहकार्याने त्यांनी सामूहिक शेततळे, सूक्ष्म सिंचन, कांदा चाळ आणि फळबाग लागवड या योजनेचा लाभ घेतलेला आहे. राहुरी कृषी विद्यापीठातून त्यांनी 2015 मध्ये आंबा कलमाची रोपे आणली आणि त्याची लागवड 2016 मध्ये केली. वेळोवेळी घेतलेल्या कृषी विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली त्यांनी आंबा बागेची जोपासना उत्तम पणे केली. माहिती तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी पुरेपूर करून आंबा बाग फुलविली. व्हाट्सअप चा उपयोग करून, याच बरोबर सुट्टीमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी आपल्या शेतीकडे लक्ष दिले‌. जवळपास 1 हेक्टर क्षेत्रावर त्यांनी आंब्याची फळबाग लागवड केलेली आहे, त्यास एकदम उत्तम दर्जाचे केशर आंबे लागलेले आहेत. त्यास कोणत्याही प्रकारची रासायनिक औषधाची फवारणी केलेली नाही व नैसर्गिकरित्या पाचटामध्ये मध्ये आंबा पिकविलेला आहे. सुरुवातीला काही व्यापारी त्यांचा आंबा 50 ते 60 रुपये किलो दराने मागत होते, मात्र त्यांच्या मनाला तो दर पटला नाही‌ ‌कृषी विभाग राबवत असलेल्या 'विकेल ते पिकेल' संकल्पने मधून त्यांनी शेतकरी ते ग्राहक थेट विक्री करण्याचे ठरविले. आणि कृषी विभागाच्या सहकार्याने त्यांना त्यामध्ये यश सुद्धा मिळाले‌. समाज माध्यमांचा प्रभावी वापर, कृषी विभागाचे सहकार्य व स्वतःचा परिचय याचा पुरेपूर उपयोग करून त्यांनी आपला आंबा दुप्पटीहून अधिक दराने म्हणजेच रुपये 150 रु प्रति किलोने विक्रीचे नियोजन केले. त्यांनी त्यांचा आंबा औरंगाबाद येथे विविध सोसायट्यांमध्ये विकला. आतापर्यंत त्यांनी 1 टन  आंबा विकलेला आहे आणि उर्वरित किमान 3 टन आंबा शिल्लक आहे. त्यांना यामधून सहा लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. खर्च वजा जाता हेक्टरी साडे पाच लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांना यामधून होईल अशी अपेक्षा आहे. कृषी सहाय्यक बालाजी घोडके यांनी त्यांना विविध योजना राबविण्यास प्रोत्साहित केले तर कृषी अधिकारी विकास लटूरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना ऑनलाइन विक्री करण्याकरिता व उत्तम बाजार भावासाठी गुगल फॉर्म द्वारे ऑर्डर घेऊन ऑनलाईन पैसे स्वीकारण्यासाठी व आंबा पुरवठा करण्यासाठी मोबाईल तंत्रज्ञान कसे वापरावे यासंबंधीचे मोबाईल सॉफ्टवेअर तयार करून दिले व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशा प्रकारे करावयाची याची माहिती समजावून सांगितली. कृषी विद्यापीठाच्या आधुनिक तंत्रज्ञानाची व माहिती तंत्रज्ञानाची उत्तम सांगड घातल्यास अधिक दर्जेदार उत्पन्न काढता येते व त्यापासून भरघोस नफा कमवीता येतो हे यावरून दिसून येते. त्यांची फळबाग पाण्यासाठी व माहिती घेण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकरी त्यांच्या शेतामध्ये येत आहेत. खरेच तंत्रज्ञानाची जोड असेल तर शेती नक्कीच फायदेशीर ठरू शकते हे यावरून स्पष्ट दिसून येते.

Post a Comment

0 Comments