शिक्षण संचालकाच्या आडमुठ्या धोरणामुळे बालकांसह पालकांचे आरोग्य धोक्यात
शेख बी जी
लातूर:दि.१ राज्यात कोरोनाची तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक असल्याचे तज्ञ सांगत असतानाच पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहाराची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात अदा करण्यासाठी राज्याच्या शिक्षण संचालकांनी आदेश दिले आहेत. मात्र हि रक्कम हवी असेल तर या विद्यार्थ्यांना बँक खाते काढण्यासाठी बँकेत धाव घ्यावी लागणार असल्याने कोरोनाचा धोका या बालकांना होण्याची शक्यता आहे. राज्यात कोरोनाचा कहर अजूनही संपलेला नाही. त्यातच आता कोरोना विषाणूच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरीएंटबाबत चिंता व्यक्त आहे. इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत शिक्षणाचा हक्क व अधिकार यांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना शारीरिक पोषण मिळण्यासाठी मध्यान्ह भोजनाची व्यवस्था केली जाते. पण गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यात आला नाही. यासाठी राज्याच्या प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी २५ जुन रोजी विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक व बँक खात्याची माहिती शाळांकडून मागवण्यासाठी आदेश जारी केले आहेत.यातून विद्यार्थ्यांना बँकेच्या खात्यात थेट रक्कम दिली जाणार आहे. आधी बँक खाते काढा, मगच शालेय पोषण आहाराचे पैसे मागा.असे आडमुठी धोरण शिक्षण संचालकांनी घातल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना शासनाकडून आर्थिक लाभ देत असताना विविध योजनांत आई किंवा वडिलांच्या बँक खात्यातून लाभ दिला गेला. पण आता पोषण आहाराची रक्कम जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांना बँकेत खाते काढून माहिती देण्यासाठी शाळांनी सूचना दिल्यानं विद्यार्थ्यांसह पालकांत संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता सुरू असतानाच शासनाने शिक्षण सुरू पण शाळा बंद अश्या पद्धतीने ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. आता मुलांच्या नावे बँकेत खाते काढण्यासाठी मोठी गर्दी होऊन कोरोनाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. गावखेड्यात शेतीची काम सुरू असल्याने मुलाच्या खात्यासाठी बँकेत चकरा माराव्या लागणार असल्याने पालकांतून नाराजीचा सूर उमटत आहे
कोरोनाची तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक ठरू शकत असल्याने विद्यार्थ्यांना बँक खाते काढून लाभाची रक्कम देण्याच्या शिक्षण संचालकांनी घेतलेल्या निर्णयावर पालकांकडून तीव्र विरोध व्यक्त होत आहे. राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या लाखो विद्यार्थ्यांची बँकेत खाती नाहीत. यापेक्षा आई किंवा वडिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा करावी अशी मागणी पालकांकडून होत आहे.
0 Comments