देविदास पांचाळ यांच्या लेखणीतून...
आली आली पंचमी... आनंदल्या सुवासिनी
भारत हा सणांचा देश आहे. वैशिष्टपूर्ण संस्कृतीचा व विविधतेत एकतेचे दर्शन घडवणारा देश आहे .भारतात विविध जाती ,धर्म, पंथाचे लोक राहतात .प्रत्येक धर्मीयांचा वैशिष्ट्यपूर्ण सण-समारंभ असतो व ते आनंदाने एकतेने पार पाडतात. प्राचीन काळापासून भारताची संस्कृती ही जगाच्या पटलावर उल्लेखनीय आहे मग ती ऐतिहासिक असेल धार्मिक असेल किंवा अध्यात्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातील असेल. वर्षातिल बारा महिन्यांपैकी श्रावण महिना हा खूप महत्त्वाचा व सणावारांचा महिना म्हणून प्रसिद्ध आहे. याच महिन्यात महत्त्वाचे सण येतात. आषाढ संपला की श्रावण सुरू होतो. श्रावणात पावसाच्या सरीवर सरी येतात निसर्गासोबत आपल्या ही मनाला ओलेचिंब करुन सोडतात. सगळीकडे हिरवीगार सृष्टी सजलेली असते अशा वातावरणात येणारा महिलांचा अत्यंत मोठा सण म्हणजे नागपंचमी होय. आपल्या भारतात परंपरेप्रमाणे सर्वत्र नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी सुवासिनी ह्या नागदेवतेची पूजा करतात, नागराजाला आपला भाऊ मानून, रक्षक म्हणून, आपल्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात कुठलेही संकट आपल्यावर व आपल्या कुटुंबावर येऊ नये म्हणून याचना करतात. पूजा प्रार्थना करतात नागोबाला मनोभावे लाह्या व दुध अर्पण करतात तसेच त्यांच्या वारुळाची ही पूजा करतात. नागपंचमी हा मुख्यत्वेकरून महिलांचा व मुलींचा सण म्हणून ओळखला जातो सण म्हटलं की बायकांच्या नवनवीन साडया आल्या, मोठ्या प्रमाणावर खरेदिला सुरुवात होते.त्यात त्याचं सजन,धजन आल,नवीन अलंकार घेणे व ते वापरणे याची फार मोठी हौस असते. या सणाला मेहंदी आणि नख पॉलिश याला खूप महत्त्वाचे स्थान आहे! सुंदर सुंदर मेहंदी ची डिझाइन आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही हात भरून कोपरापर्यंत पोहोचलेली मेहंदी, मेहंदी चे वेगवेगळे सुंदर नक्षी व मेहंदीची कलाकुसर ही आपल्याला पाहायला मिळते. नागपंचमीच्या सणाला मेहंदी ही शुभ मानली जाते, मंगलमय मानली जाते ज्याप्रमाणे मेहंदीचा रंग खुलतो अगदी तसाच त्यांच्या जीवनात आनंदी आनंद व रंग-बिरंगी फुलपाखरासारखे सुंदर बनते .नागपंचमी च्या सणाला नवीन नववधू आपल्या माहेरी येतात व येताना सासरची आठवण घेऊन येतात. झोका खेळणे या सणाचे मुख्य वैशिष्ट्य आहे .उंच माझा झोका ग म्हनत या माहेरवाशिणी लहानापासून ते मोठ्यापर्यंत झोका खेळण्याचा आनंद घेतात! ग्रामीण भागात हा झोका गावशेजारी असलेल्या मोठ्या चिंचेच्या ,वडाच्या, लिम्बाच्या झाडाला बांधला जातो. नागपंचमी चे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे झिम्मा आणि फुगडी खेळतात. आनंदाने एकत्र येऊन एकमेकात मिसळतात व या सर्व खेळाचा आनंद घेतात." किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला "असे म्हणत वेगवेगळे खेळ आनंदाने खेळतात.
फुगडी, भुलई नावाचा खूप जुना व परंपरे पासून चालत आलेला खेळ जो मनाला आनंद देतो गल्लीतील सर्व बायका एकत्र येऊन फेर धरतात म्हणजे गोल वर्तुळ करतात व विविध पारंपारिक गाणे म्हणत गोल फिरत असतात. ते गाणे ही खूप वैशिष्ट्यपूर्ण असतात त्यांना भुलईचे गाणे असे म्हणतात. श्रावण महिना हा सर्वात पवित्र महिना समजला जातो, याच महिन्यात पूजा-पाठ, पोथी पुराण, सत्य नारायण पूजा, पारायण, अखंड हरिनाम सप्ताह, पारायणे, भजन, कीर्तन, प्रवचन, असे धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आनंदाने केले जातात. सर्व काही विसरुन अनेक भाविक भक्त त्यात सहभागी होतात व देवाचे चिंतन करतात. श्रावण महिना हा सर्वात पुण्यफल देणारा मानला जातो. नवीन लग्न झालेल्या सुवासिनी चा खरा आनंदाचा क्षण! व ही नववधू पहिल्यांदा पहिल्या पंचमी च्या सणाला आपल्या माहेरी येत असते . माहेरची ओढ, माहेरचे प्रेम, सर्व कुटुंबीयांचे निश्चल प्रेम! माहेरची ओढ तिला होत असते. ही आपली परंपरा आपल्या सर्व प्रेमाच्या माणसांना भेटण्यासाठी आतुर झालेली असते व ती या सणाला माहेरी येत असते .ही आपली परंपरा आपल्या सर्व प्रेमाच्या माणसांना भेटण्यासाठी आतुर झालेली असते व ती या सणाला माहेरी येते. माझं माहेर, माहेर ,कसं स्वर्गा समान !म्हणत आपल्या माहेरची माणसं व माहेराचं गुणगान करत असते! तसेच आपल्या सर्व मैत्रिणी समवेत सासरकडील आपल्या सर्वांचे कोड कौतुक सांगत असते .नवरा माझा किती गुणी, सासरा सासू किती सद्गुणी हे मुलीच्या गाण्यातून आवर्जून सांगत असते. आली आली पंचमी आनंदल्या सुवासिनी! अशाप्रकारे ही सुवासिनी सासर व माहेर दोन्ही घराण्याचा उद्धार करणारी असते. नागपंचमीच्या दिवशी नाग राजाची, नाग देवाची पूजा केली जाते. त्याला दूध पाजले जाते. पंचमीचा दिवस खूप महत्त्वाचा असतो. दुध व लाह्या नागोबाला अर्पण करून पूजा केली जाते. पण आश्चर्य जर खरोखरच नागदेवता समोर आले तर मात्र आपण सर्वजण जीव वाचवण्यासाठी धावपळ करीत असतो फक्त दगडाच्या देवाची पूजा मनोभावे केली जाते पण खरोखरच जर नागराजा समोर आला तर मात्र आपली पाचावर धारण बसते! त्याची पूजा तर सोडाच पण त्याला कधी मारावे तो कसा मरेल हीच चिंता सर्वांना सतावते! पण या सणापासून आपल्याला पशुपक्षी प्राण्यावर दया केली पाहिजे .आपल्या भारत देशात दगडाची ही मनोभावे पूजा केली जाते. त्यात आपला विश्वास, श्रद्धा व भक्ती असते. तसेच प्रत्येक सणाच्या पाठीमागे विज्ञानाची जोड आहे हे आपल्याला मान्य करावेच लागेल. या सर्व सणांचा पर्यावरण व त्याच्याशी निगडित असणाऱ्या सर्व घटकांचा संबंध आहे. म्हणून पर्यावरणाचा सांभाळ करणे ही काळाची गरज आहे. नागपंचमी साजरी करीत असताना वृक्षारोपण करून जर नागपंचमी साजरी करता आली तर या एवढे मोठे सामाजिक कार्य कोणतेच नसेल !वृक्ष लावा, वृक्ष जगवा! पृथ्वी सांभाळा व आपले आरोग्य सांभाळा व सण आनंदाने साजरा करा हीच अपेक्षा. पुनश्च एकदा नागपंचमीच्या सर्व माता-भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
देविदास श्रीनिवासराव पांचाळ(सहशिक्षक)
श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर
0 Comments