मुक्त पत्रकार सतीश तांदळे यांच्या लेखणीतून...
"माझं लातूर" स्नेह, विश्वास अन जबाबदारी
माझं लातूर परिवार येत्या एप्रिलमध्ये आपल्या अस्तित्वाचे 8 वर्ष पूर्ण करीत आहे. एप्रिल 2014 मध्ये लातूर जिल्ह्यातील पत्रकार आणि काही जिवलग मित्रांशी संपर्क, समन्वय राहावा या उद्देशाने माझं लातूरची निर्मिती झाली. परिसरातील महत्वाच्या घटना, राजकीय, सामाजिक घडामोडी, बातम्या, हलके फुलके विनोद, शायरी, गाणी यासोबतच विचारांची देवाणघेवाण वाढली. माझं लातूर समूहाची चर्चा सुरू झाली ज्येष्ठ पत्रकार, विधिज्ञ, साहित्यिक, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, अभियंते, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांचा सक्रीय सहभाग वाढत गेला. वैयक्तिक सुख-दुःख, वाढदिवस, कौटुंबिक सोहळ्यात एकमेकांना मदत करण्याचा पायंडा पडत गेला आणि एका समूहाचे रूपांतर एका सामाजिक परिवारात कधी झाले हे कुणाला कळलेच नाही. ज्येष्ठ सदस्यांचे मार्गदर्शन, सल्ला, सूचना मोलाच्या आणि परिणामकारक ठरत आहेत.
"मुझ में थोड़ी सी जगह भी नहीं नफ़रत के लिए....
मैं तो हर वक़्त मोहब्बत से भरा रहता हूँ!"
परिवारातील प्रत्येक सन्माननीय सदस्य हा आपल्या कुटुंबाचा भाग आहे ही भावना निर्माण करण्यात माझं लातूर यशस्वी झाले आहे. समूह म्हटले की राजकीय, सामाजिक, वैचारिक मतांतरे आलीच. असे असतानाही प्रत्येकाने इतर सदस्यांच्या मतांचा आदर, सन्मान करण्याचा अलिखित नियम पाळून आपली परिवारातील योग्यता सिद्ध केली आहे. हे संकेत सर्वांनी पाळले तर याहून अधिक चांगले सकारात्मक सामाजिक कार्य एक परिवार म्हणून आपण करू शकतो. माझं लातूर परिवारातील 255 पैकी जवळपास 150 मान्यवर सदस्य माझं लातूरच्या निर्मितीपासून सोबत आहेत. यातच या परिवारातील सदस्यांचा एकमेकाप्रती असलेला जिव्हाळा स्पष्ट होतो. सर्व स्तरातील मान्यवरांना या परिवारात सहभागी करून लातूरच्या हितासाठी सर्वसमावेशक विचारमंथन व्हावे हा उदात्त हेतू ठेऊन आजपर्यंतची वाटचाल सुरू आहे. लातूरच्या अनेक प्रलंबित समस्या, मूलभूत प्रश्न यावर साधक-बाधक चर्चेतून मार्ग शोधण्यात माझं लातूर परिवार यशस्वी ठरले आहे. पत्रकार, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते यांच्या समन्वयाने अनेक गरजू, होतकरू नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य माझं लातूरच्या माध्यमातून होताना आपण प्रत्यक्ष अनुभवले आहे.
"सात संदूक़ों में भर कर दफ़्न कर दो नफ़रतें...
आज इंसाँ को मोहब्बत की ज़रूरत है बहुत!"
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लातूरवर आलेले संकट आपण कुणीही विसरू शकत नाही. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांची होणारी ससेहोलपट, प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणेवर आलेला प्रचंड ताण आणि हतबलता पाहून परिवारातील सामाजिक जाण असणाऱ्या अनेक मान्यवर सहकाऱ्यांनी कोरोना विरुद्धच्या या लढ्यात प्रत्यक्ष ग्राऊंडवर उतरून गरजू रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा मानस केला आणि तो प्रत्यक्षात उतरविला. या कार्यासाठी कुटुंबातीलच सर्व मान्यवरांनी आर्थिक मदत केली. या मदतीतून कोरोना मदत केंद्र, निवारा केंद्र, 2 ऑक्सिजन कौन्सनट्रेटर(विकत घेऊन) उपलब्ध करून देण्यात आली. परिवाराने आणि सर्वसामान्य लातूरकरांनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरविण्यात माझं लातूर यशस्वी ठरले. यानंतरच्या काळातही माझं लातूर परिवाराने रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी, ऑनलाईन योग शिबीर(2), मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर(2) यशस्वी करून अनेक गरजूंना दिलासा दिला. सांगली, रत्नागिरी, चिपळूण येथील पूरग्रस्त कुटुंबियांना प्रत्यक्ष तेथे जाऊन संसारोपयोगी वस्तू आणि अन्नधान्य पुरवून आपली सामाजिक बांधिलकी जपली. यापुढील काळातही माझं लातूर परिवाराच्या वतीने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातील. या उपक्रमात परिवारातील उर्वरित मान्यवर सदस्यांनीही सहभागी व्हावे ही अपेक्षा आहे.
"रिश्तों को मजबूत बनाने के लिए,
एक छोटा सा उसूल बनाते हैं...
रोज कुछ अच्छा याद रखते हैं,
और कुछ बुरा भूल जाते हैं!"
माझं लातूर परिवारावर लातूरकरांचा विश्वास आहे हा विश्वास कायम ठेवण्यासाठी सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न करावेत ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपले वर्तन स्नेहाचे आणि आदरपूर्वक असले पाहिजे. माझं लातूरच्या प्रत्येक सन्माननीय मान्यवरांचा सार्थ अभिमान आहे. परिवार म्हणून आता आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. आपल्याकडून चुका होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे.
"नर्म लफ़्ज़ों से भी लग जाती है चोटें अक्सर,
रिश्ते निभाना बड़ा नाज़ुक सा हुनर होता है!"
सतीश तांदळे, ज्येष्ठ पत्रकार तथा "माझं लातूर" समूह प्रमुख
0 Comments