प्रा. डॉ. चंद्रकुमार कदम(उपप्राचार्य, महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा) यांच्या लेखणीतून...
कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचे शैक्षणिक धोरण
९ फेब्रुवारी, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र शिक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शिक्षण समितीच्या भव्य प्रांगणामध्ये दादासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी भुमिपुजन होत आहे. निलंगा परिसराचा सर्वांगीण विकास करून निलंगा परिसराची ओळख देशपातळीवर पोहोचवणार्या शिल्परत्नाच्या कार्याची ओळख आपणास व्हावी म्हणून हा लेख मी आपणासमोर ठेवत आहे. कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचा जन्म दिनांक ९ फेब्रुवारी १९३१ रोजी निलंगा तालुक्यातील नणंद या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण निलंगा येथे तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण नूतन विद्यालय, गुलबर्गा येथे झाले. पदवीचे शिक्षण उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद येथून झाले, तर पदव्यूत्तर शिक्षण नागपूर विद्यापीठ, नागपूर येथून साहेबांनी पूर्ण केले. सन १९८६ साली दादासाहेबांनी आपला राज्यशास्त्रातील संशोधन प्रबंध नागपूर विद्यापीठात सादर करून राज्यशास्त्रातील अतिउच्च डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी प्राप्त केली. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच, परिसरातील दळणवळणाच्या असुविधा, अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये असतानाही निलंगेकर साहेबांनी आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये कुठेही खंड पडू दिला नाही. आज कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या अनेक धोरणांची प्रकर्षाने उणीव भासते. त्यातही त्यांच्या शैक्षणिक धोरणाविषयी ही बाब अधोरेखित करावी वाटते. निलंगा परिसरासोबतच मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाला गती आणि दिशा देण्याचे महत्वपूर्ण कार्य कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी केले. शेती, जलसिंचन, सहकार, उद्योग आणि शिक्षण आदी क्षेत्राचा विकास दादासाहेबांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने घडवून आणला. कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचे नेतृत्व हे सुसंस्कृत आणि दूरदृष्टीचे होते. साहेबांच्या कृतिशील विचारातून आजचे प्रगत निलंगा परिसर घडल्याचे आपणास दिसून येते. संपूर्ण देशामध्ये निलंगेकर म्हणजे महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील निलंगा आणि निलंगा म्हणजे निलंगेकर असा नावलौकिक या निलंगा परिसराला मिळवून दिला यामध्ये कै. डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात महागडे होत जाणारे शिक्षण आणि उच्च शिक्षणातून आपली जबाबदारी झटकणारे शासनाचे धोरण आणि निलंगा परिसरातील गोरगरिबांच्या / सर्वसामान्यांच्या शिक्षणाचा निर्माण झालेला प्रश्न भविष्यात गंभीर स्वरूप धारण करेल, या पार्श्वभूमीवर कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या शैक्षणिक धोरणाची निलंगा परिसरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला नितांत गरज आहे असे मला म्हणावेसे वाटते. कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचा शैक्षणिक दृष्टिकोन, भूमिका आणि धोरण यावर मी या लेखात थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. शिक्षणाविषयी नेहमी बोलताना कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब म्हणायचे की, शिक्षणाने माणूस घडतो आणि शिक्षणानेच माणसाचा सर्वांगीण विकास होतो. उच्च शिक्षणासाठी ज्या हाल अपेष्टा मला सोसाव्या लागल्या / सहन कराव्या लागल्या, त्या, या निलंगा परिसरातील गोरगरिबांच्या/ सर्वसामान्यांच्या वाट्याला येऊ नयेत, यासाठी त्यांनी "शिक्षण आपल्या दारी " हा सदैव प्रयत्न केलेला आहे. आपल्या निलंगा परिसराचा विकास करावयाचा असेल तर भौतिक साधन संपत्ती पेक्षा सर्वात महत्त्वाची साधन संपत्ती म्हणजे या परिसरातील जनतेचे शिक्षण हे त्यांनी जाणले. ज्याप्रमाणे कोणत्याही इमारतीचा पाया मजबूत असल्याशिवाय ती इमारत मजबूत असू शकत नाही, त्याचप्रमाणे निलंगा परिसरातील जनता व शिक्षण या दोन्ही बाजू विकसित झाल्याशिवाय निलंगा परिसराचा विकास होऊच शकणार नाही, ही खूणगाठ त्यांनी बांधली. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे एक हत्यार आहे. उत्कृष्ट नागरिक हा शिक्षणाच्या माध्यमातून घडवता येतो. भावी सक्षम नागरिक घडवण्यासाठी शिक्षण मदत करत असते. निलंगा परिसराचे शैक्षणिक धोरण निश्चित करताना कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी देशातील शिक्षणाचा इतिहास व परंपरा याचा पुरेपूर अभ्यास केला होता. १९६४- ६६ साली डॉ. डी. एस. कोठारी यांच्या अध्यक्षते खालील शिक्षण आयोगामध्ये शैक्षणिक विस्तार व गुणवत्ता; देशाचे भवितव्य हे वर्गा-वर्गातून घडत असते; शिक्षणातूनच देशाचा विकास, या व इतर शिक्षणविषयक पैलुंचा सविस्तर अभ्यास कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी केला होता. निलंगा परिसरातील बहुसंख्य समाज हा अनेक वर्षापासून उच्च शिक्षणापासून वंचित राहिलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने भारत देश आणि येथील लोकशाही मजबूत करावयाची असेल तर उच्च शिक्षणाची ज्ञानगंगा ही सर्वसामान्यांच्या, बहुजन गोरगरीबांच्या दारापर्यंत पोहोचवली पाहिजे असा साहेबांचा ध्यास होता. इ. स. १९६२-७० या कालखंडामध्ये राष्ट्राचे शैक्षणिक धोरण आणि राष्ट्राच्या सर्वांगीण विकासामध्ये सर्वसामान्यांचा सहभाग यामध्ये खूप मोठी तफावत होती. कै.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते व निलंगा मतदार संघाचे आमदार म्हणून १९६२-६८ पासून कार्य करीत असताना निलंगा परिसरातील संपूर्ण खेडोपाडी त्यांनी भ्रमंती केली. त्यांच्या या भ्रमंतीमुळे त्यांना येथील ग्रामीण भागातील जनतेच्या गरिबी, प्रचंड दारिद्र्याची, भयंकर अज्ञानाची व अपार अंधश्रद्धेची त्यांना जाणीव झाली. जनतेच्या या बहुतेक समस्यावर या परिसराचा शैक्षणिक विकास हा एकमेव उपाय होय असा विचार त्यांनी केला. नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभाव, दळणवळणाच्या बाबतीत चहूबाजूंनी खितपत पडलेले वाळवंटी प्रदेश आणि ज्ञानाच्या अंधारात सनातन्यांच्या बाहुपाशात अडकलेला, त्यांच्या प्रत्येक कृतीला निसर्गाची किमया मानणारा अशिक्षित समाज, या अशा अष्टदिशांनी विखुरलेल्या या निलंगा परिसरामध्ये शिक्षणाचा विकास साधण्यासाठी कै. डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी आपले सर्वस्व पणाला लावून सन १९७० साली या निलंग्यामध्ये शैक्षणिक संस्था उभी करण्याचे धाडस बांधले. आणि महाराष्ट्र शिक्षण समितीची मुहूर्तमेढ रोवली. आणि या अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षणाची सुरुवात येथे केली.
पारंपारिक शिक्षण येथील जनसामान्यांना मिळावे एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर विज्ञान, तंत्रज्ञान व कौशल्याभिमुख शिक्षण याचेही शिक्षण येथील सर्वसामान्यांना मिळावे म्हणून अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, बी.व्होक. महाविद्यालय व तसेच विज्ञान महाविद्यालयाची सुरुवात साहेबांनी आपल्या शिक्षण अंतर्गत केली. उज्वल व सुसंस्कृत भवितव्याची कामना करण्यासाठी एक सुसंस्कृत शिक्षक, उद्याच्या भावी अनेक पिढ्या घडवण्यासाठी मदतगार ठरू शकतो, म्हणून येथील प्रत्येक शिक्षक / प्राध्यापकांच्या नेमणूकीदरम्यान कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे अनेक कामाच्या व्यापामध्ये असतानाही ते स्वतः वैयक्तिक रित्या प्रत्येक शिक्षक/ प्राध्यापकांच्या मुलाखतीस आवर्जून उपस्थित राहत असत. मग त्या निवडीमध्ये त्यांनी जात, धर्म , प्रांत याला महत्व दिले नाही तर संबंधित शिक्षकांने संपादन केलेल्या ज्ञानाला महत्व दिले. आणि वेगवेगळ्या संस्कारांमध्ये वाढलेल्या ज्ञानवंतांना त्यांनी या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी प्रवृत्त केले. जेणेकरून या निलंगा परिसरातील संस्कृतीचे संरक्षण , संवर्धन व्हावे व ती वृद्धिंगत व्हावी हा एकमेव हेतू त्यांनी बाणला होता. एकदा नेमणूक झालेला शिक्षक हा त्याच-त्याच त्याच्या तुटपुंज्या ज्ञानाच्या आधारावर वर्षानुवर्षे कार्य करण्याऐवजी, शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे यावरही कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचा अट्टाहास असायचा. शैक्षणिक सुविधा पुरविण्याचा आटोकाट प्रयत्न करून सर्व शाळा महाविद्यालयांच्या प्रयोगशाळा प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी सुसज्ज रहाव्यात यासाठीची कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांची कमालीची तळमळ आम्ही अनुभवलेली आहे. या परिसरातील विद्यार्थी घडवताना, त्यांचा शैक्षणिक अभ्यासक्रम हा केवळ पदवी प्राप्त करणे एवढ्यापुरताच मर्यादित न राहता, जीवनावश्यक कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमावर भर देण्यात यावा असा साहेबांचा अट्टाहास असायचा. विद्यार्थ्यांना ग्रंथालयाकडे जा असे म्हणण्याऐवजी शिक्षकांनीच प्रथमता ग्रंथालयाकडे गेले पाहिजे. स्वतः वाचन लिखाण करून विद्यार्थ्यांमध्येही वाचनाची लिखानाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी सतत प्रयत्नरत राहिले पाहिजे व नाविन्यपूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यासाठी शिक्षक सदैव तत्पर राहिला पाहिजे असे कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचे मत होते. वार्षिक अभ्यासक्रम राबवत असताना निलंगा परिसरातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून विद्यार्थ्यांची आकलन शक्ती वाढवणारे, विद्यार्थ्यांच्या विचारांची क्षमता रुंदावणारे अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रम शाळा-महाविद्यालयांमध्ये व्हावेत यासाठी कै.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब प्रयत्नरत असायचे. एखाद्या ज्ञानवंत व्याख्याता आपले व्याख्यान देण्यासाठी निलंगा नगरीमध्ये आला आहे असे समजताच मग तो वयाने मोठा असो की लहान याचा कधीच विचार न करता साहेब स्वतः त्या ज्ञानराजाची भेट घेण्यासाठी शाळा महाविद्यालयात जात असत.. एवढेच नाही तर प्रत्यक्ष व्याख्यानाच्या वेळी विद्यार्थ्यांसमवेत दोन-दोन, तीन-तीन तास बसून विचारवंतांचे विचार साहेब ऐकत असत. यातूनच त्यांच्या ज्ञानार्जनाच्या आवडीचे दर्शन होताना आपणास दिसून येते. आपला विद्यार्थी हा केवळ बुद्धीनेच विकसित न होता त्याचा शारीरिक विकासही तितकाच महत्वाचा आहे हे जाणून कै.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी या निलंगा परिसरातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये भव्यदिव्य खेळांची मैदाने उभारण्यावर भर दिला. राष्ट्रीय स्तरावरील विविध खेळांचे खेळाडू निलंगा येथे आले पाहिजेत म्हणून क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, खो-खो, बास्केटबॉल यासारख्या राष्ट्रीय स्तरावरील मैदानी स्पर्धांचे निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या मैदानामध्ये आयोजन व्हावे याबाबत वेळोवेळी ते सांगत असत व प्रयत्नरत असत. समाजातील सामाजिक, आर्थिक विकासाचे महत्वाचे साधन हे शिक्षण आहे आणि ते समाजाच्या सर्व थरातील विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे म्हणून या परिसरातील अनेक खेडोपाडी वसतिगृह व समाज मंदिरांची उभारणी करून या परिसरातील लक्षावधी विद्यार्थ्यांना आपल्याच परिसरात प्राथमिक ते उच्च शिक्षण घेण्याचा मार्ग खुला करून दिला. शिक्षण घ्या शहाणे व्हा, पण उच्चशिक्षित होऊन आपल्या मातृभूमीला कधीच विसरू नका. ही मातृभूमी माझी आहे, आणि मी या मातृभूमीचे काहीतरी देणे लागतो याचे भान सर्व उच्चशिक्षितांनी ठेवावे असे कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब नेहमी सांगत असत. त्याच बरोबर आपल्या परिसरातील सर्व जनतेची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे म्हणून जलसिंचनाच्या अनेक योजना या निलंगा परिसरामध्ये राबवून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने येथील शेतीचा विकास साधण्याचा प्रयत्न दादासाहेबांनी केलेला आहे. ध्येयाने प्रेरित होऊन रात्रंदिवस जनसेवेचा ध्यास अंगी बाळगून शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजन समाजापर्यंत पोहोचवणा-या या महान शिक्षण प्रसारकाप्रती मी शतदा नमन करतो.
जयंतीनिमित्त दादासाहेबांना विनम्र अभिवादन....!
प्रा.डॉ.सी.जे.कदम
उप-प्राचार्य,महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा



0 Comments