लातूर येथील आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. ऋषिकेश कांबळे
ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक सीताराम धसवाडीकर स्मृतीदिना निमित्त संमेलन
शिवाजी कांबळे
लातूर: ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते सीताराम धसवाडीकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त लातूर येथे १६ व १७ एप्रिल रोजी दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात होणार्या आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात साहित्यिक, विचारवंत व महात्मा फुले-आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार डॉ. ऋषिकेश कांबळे यांची निवड झाली आहे. अशी माहिती आज या साहित्य संमेलनाचे संयोजक डॉ. हर्षवर्धन कोल्हापूरे व स्वागताध्यक्ष प्रा. युवराज धसवाडीकर यांनी दिली आहे.
लातूर येथे डॉ. हर्षवर्धन कोल्हापूरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संमेलनाध्यक्षपदी डॉ. ऋषिकेश कांबळ यांची निवड करण्यात आली आहे. ऋषिकेश कांबळ यांची ‘अस्तित्व आणि अस्मिता परिवर्तन आणि प्रबोधन, कालवाह, दलित कविता : संदर्भ आणि संदर्भ, वादाचिये गावा, दलित कविता आणि अमेरिकन ब्लॅक पोएट्री, भाई तुम्ही कुठे आहात ही त्यांची ग्रंथसंपदा प्रसिद्ध आहे. डॉ. कांबळे हे साठोत्तरी साहित्यातील दलित ग्रामीण आदिवासी व स्त्रीवादी प्रवाहातील महत्त्वाचे समीक्षक मानले जातात. फुले, आंबेडकर चळवळीचे भाष्यकार, प्रभावी वक्ते म्हणूनही त्यांचा लौकिक आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार व्हावा, समग्र बहुजन समाजात त्यांच्या हक्काची व कर्तव्याची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी या आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक स्मृतीशेष सीताराम धसवाडीकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ करण्यात आलेले आहे. असे प्रा. युवराज धसवाडीकर यांनी सांगितले आहे. या बैठकीला आंबेडकरी साहित्य संमेलन संयोजन समितीचे कार्याध्यक्ष डी. एस. नरसिंगे, कार्यवाह डॉ. दुष्यंत कटारे, डॉ. अशोक नारनवरे, सहकार्यवाह गौतम साबळे, मोहन कांबळे, मुख्य संयोजक डॉ. लहू वाघमारे, उपाध्यक्ष प्रा. कुमार जाधव, डॉ. विजय अजनीकर, पांडुंरग वाघमारे, प्रशांत जानराव, डॉ. मा. ना. गायकवाड, सल्लागार प्रा. सुधीर अनवले, डॉ. माधव गादेकर, डॉ. प्रदीप सूर्यवंशी, प्रा. बापू गायकवाड व नरसिंग घोडके आदींची उपस्थिती होती.

0 Comments