उदगीर शहरात सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीत ईद मिलन सोहळा
उदगीर: जमाअते इस्लामी हिंद, शाखा उदगीर तर्फे दरवर्षी रमजान ईदनंतर सर्व धर्मीय बांधवांकरिता ईद मिलन कार्यक्रम घेण्याची सुंदर परंपरा आहे. मागील तीन वर्षापासून कोवीड-19 मुळे ही परंपरा खंडित झाली होती. यावर्षी हा कार्यक्रम शहरातील रघुकुल मंगल कार्यालयात घेण्यात आला, विशेष म्हणजे सर्वधर्मीय धर्मगुरूंनी आपली उपस्थिती नोंदवून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुरआनच्या पठाणाने हाफिज मेराजूल हक़ यांनी अरबीसह मराठी भाषांतर प्रस्तुत केले. प्रास्ताविक भाषण जमात-ए-इस्लामीचे शहराध्यक्ष दायमी अब्दुर्रहीम कार्यक्रम ठेवण्यामागचा उद्देश व रमजानसह जमाअते इस्लामीच्या कार्याचा परिचय केला.
प्रमुख पाहुण्या पैकी शहरातील क़ासिमूल उलूम मदरस्याचे मौलाना अन्सार साहेबांनी रोज्यांचा परिचय करून दिला. ह. भ. प. सहदेव महाराजांनी सर्व धर्मातील तत्व चांगले आहेत आपण यावर आचरण केले तरच आपले कल्याण होईल असे सांगितले. शहरातील मेथोडिस्ट चर्चचे प्रमुख रेव्ह. देवदास एन. रणदिवेनी आपल्यावर परमेश्वराचे अनेक उपकार आहेत त्याची आपण जाण ठेवून जीवन जगावे असा सल्ला दिला.
कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून देवणीकर मु. हक्कानी यांनी रमजान रोजा व ईद यावर प्रकाश टाकला. रोजाचा उद्देश फक्त उपाशीपोटी राहणे नाही तर मानवाने आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. रोजामुळे चरित्र घडते. सुंदर समाज निर्माण होतो. रमजानचे महत्व पवित्र कुरआनच्या अवतरण यामुळे आहे. कुरआनचा केंद्रबिंदू मानव असून पृथ्वीतलावरील सर्व मानव आपापसात बंधू-भगिनी आहेत. साऱ्या सृष्टीचा निर्माता फक्त एक अल्लाह (ईश्वर) आहे, त्याने या जगात मानवांच्या मार्गदर्शना करिता अनेक संदेशवाहक पाठविले. पैगंबर मुहम्मद(स.) हे अंतिम संदेश वाहक असून ते सकल मानवजातीकरीता आहेत. या जगात आम्ही जे कर्म करत आहोत याचे फळ मरणोत्तर जीवनात प्रत्येकाला प्राप्त होतील, म्हणून मानवाने शुद्ध श्रद्धे बरोबर शुद्ध आचरण ही केले पाहिजे, ज्यामुळे आपले परलोकीय जीवन यशस्वी होईल.
शेवटी हाशमी मिसबाहुद्दीन, जिल्हाध्यक्ष जमाअते इस्लामी हिंद, लातूर यांनी अध्यक्षीय भाषणात देशातील अनेक समस्या व त्यांच्या समाधानाकरिता शांतता आवश्यक आहे यासाठी सर्व धर्मीय बांधवांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. जमाअते इस्लामीच्या या कार्याची प्रत्येक स्तरातून प्रशंसा होत असून असे कार्यक्रम नेहमी होत राहावेत, ज्यामुळे शहरात शांतता, आपुलकी, प्रेम, बंधुभाव व सौहार्द वाढेल आणि प्रगतीचे दार नेहमीकरिता खुले राहतील असे चर्चा विचार उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख़ इसहाक़ सचिव जमाअते इस्लामी, उदगीर तर आभार प्रदर्शन अब्दुल मुजीब यांनी व्यक्त केले. शहरातील सर्व धर्मीय बांधव मोठ्या संख्येने कार्यक्रमात उपस्थित होते.


0 Comments