आक्षेपार्ह पोस्ट कराल तर तुरुंगात जाल, सोशल मीडियावर लातूर पोलिसांची बारीक नजर
लातूर: याबाबत थोडक्यात माहिती अशी की, मागील काही दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमांतून धार्मिक आणि जातीय भावना दुखावून दोन समाजांत तेढ निर्माण होतील असं स्टेटस, व्हिडिओ क्लिप्स,आक्षेपार्ह मजकूर, एसएमएस तयार करून प्रसारित करणाऱ्या विरोधात पोलीस अधीक्षक कार्यालयाने कारवाई सुरू केली.
पोलीस अधीक्षकांच्या सूचना
-सोशल मीडियाच्या माध्यमांतून पसरवण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टची यूझर्सनी सर्वप्रथम खात्री करणं अत्यावश्यक आहे.
- जुन्या वादग्रस्त घटनांचा काही समाजकंटक फायदा घेण्याच्या प्रयत्नात आहेत. ते सोशल मीडियातून निराधार आणि खोट्या अफवा पसरवून जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
- पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावं. त्यांच्याकडून प्रक्षोभक किंवा समाजमन दुखावलं जातील, अशा आशयाचं मत सोशल मीडियावर जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.
- सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करून तेढ निर्माण होईल, अशा प्रकारच्या पोस्ट तयार करू नये किंवा फॉरवर्ड करू नये.
- कोणत्याही पोस्टला प्रतिक्रिया देताना संयम बाळगावा, प्रत्युत्तर देताना शब्द जपून वापरावेत.
- सोशल मीडियावर प्रत्युत्तर देताना अपशब्दांचा वापर करणंही गुन्हा आहे.
- कोणत्याही वर्गाच्या, धर्माच्या किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने हेतूपुरस्सर आणि वाईट उद्देशाने तोंडी किंवा लेखी शब्दांनी किंवा चिन्हाद्वारे; तसंच दृश्य देखाव्याद्वारे (व्हिजिबल रिपर्सटेशन) त्या वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला प्रचलित कायद्यानुसार 3 वर्षांपर्यंत कारावासाची दंड शिक्षा होऊ शकते.
तरुणांकडे लक्ष द्या.
सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींमध्ये बहुतांश 19 ते 30 या वयोगटांतील तरुण आहेत. काही कारणामुळे हे तरूण अशा चुकीच्या पोस्ट करत आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर अशा मुलांना त्यांच्या कृतीचा नंतर पश्चाताप होतो; मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. पालकांनीही आपल्या मुलांकडे लक्ष द्यावं, असं आवाहन लातूर पोलिसांनी केलं आहे.



0 Comments