Latest News

6/recent/ticker-posts

लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन


मुंबई : लातूर जिल्हा रुग्णालयाच्या प्रश्नाबाबत आपण स्वतः लक्ष घालणार असून हा महत्वपूर्ण विषय लवकर मार्गी लागेल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझं लातूर परिवाराच्या शिष्टमंडळास दिले. मुंबई येथील वर्षा निवासस्थानी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले त्यावेळी बोलताना शिंदे यांनी हे आश्वासन दिले.


गत १२ वर्षांपासून मंजूर असूनही जागा हस्तांतरापोटी आरोग्य विभागाने कृषी विभागास फक्त ३ कोटी ३२ लाख रुपये मोबदला देणे आहे या जुजबी कारणासाठी हा विषय शासन दरबारी प्रलंबित आहे. या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माझं लातूर परिवाराने २ ऑक्टोबर २०२३ पासून शहारातील गांधी चौक येथे बेमुदत साखळी उपोषणास प्रारंभ केला होता. या उपोषणास लातूरकरांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला होता. माजी आमदार वैजनाथ शिंदे, शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी खासदार डॉ सुनिल गायकवाड, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपराव देशमुख, माजी महापौर दिपक सुळ, विक्रांत गोजमगुंडे यांनी प्रत्यक्ष उपोषण स्थळी भेट देऊन जाहीर पाठींबा दिला होता. तर ६२ सामाजिक संघटना, संस्था यांनी उपोषणास समर्थन असल्याचे पत्र दिले होते.

उपोषणाच्या ६ व्या दिवशी शासनाचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून तहसिलदार सौदागर तांदळे, जिल्हाधिकारी वर्षा घुगे ठाकूर, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यु पवार यांनी एका महिन्यात हा प्रश्न सोडविला जाईल असे आश्वासन दिले आणि उपोषण तात्पुरते स्थगित करण्याची विनंती उपोषणकर्त्याना केली. त्यानुसार ७ ऑक्टोबर २०२३ रोजी माझं लातूर परिवाराने उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आंदोलनाचाच भाग म्हणून १९ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई येथे मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीष महाजन, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, उद्योगमंत्री उदय सामंत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. दरम्यान जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आमदार अमित देशमुख, आमदार अभिमन्यु पवार, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांना तर तीनदा प्रत्यक्ष भेटून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा असे साकडे घातले होते. या दरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून, पत्र, ईमेलद्वारे पाठपुरावा सुरूच ठेवला. 


शेवटी या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष भेटण्याचा निर्णय माझं लातूर परिवाराने घेतला आणि त्या अनुषंगाने ६ मार्च २०२४ रोजी मुंबई येथील वर्षा शासकीय निवासस्थानी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. आम्ही ५ महिन्यांपासून अविरतपणे जिल्हा रुग्णालयासाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत आहोत असे सांगितले. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी मी स्वतः लक्ष घालून हा विषय लवकरात लवकर कसा मार्गी लागेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले. याप्रसंगी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचीही यावेळी उपस्थिती होती. शिष्टमंडळात सतीश तांदळे, अभय मिरजकर, दिपरत्न निलंगेकर, विश्वजीत गायकवाड, डॉ सितम सोनवणे, डॉ जुगलकिशोर तोष्णीवाल, संजय स्वामी, काशिनाथ बळवंते, संजय जेवरीकर, उमेश कांबळे यांचा समावेश होता.

Post a Comment

0 Comments