घरणी मध्यम प्रकल्पातील चाकुरला पाणी पळवल्यामुळे नळेगाव व परिसरातील शेतकऱ्यांचा लातूर मध्ये आत्मदहनाचा प्रयत्न
लातूर : दि १२ मार्च घरणी मध्यम प्रकल्पातील पाणी नगर पंचायत चाकुरला नेल्यामुळे नळेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी आज दि १२ मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डिजेल अंगावर ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे मधस्ती करत आंदोलन करण्याऱ्या शेतकऱ्यांची समजुत काढत शांत केले आहे.
चाकूर तालुक्यातील शिरूर अनंतपाळ, नळेगाव व परिसरातील ४० गावांसाठी वरदान ठरलेल्या तसेच शेतीत सिंचनाच्या माध्यमातून समृद्धी आणणाऱ्या घरणी मध्यम प्रकल्पातील पाणी चाकूरला नेण्याचा घाट सुरू आहे. घरणी मध्यम प्रकल्पाची क्षमता २५.५४ दशलक्ष घनमीटर असून शिरूर अनंतपाळ सह नळेगाव व परिसरातील ४० गावांना बारमाही पाणीपुरवठा करण्यात येतो या प्रकल्पावर परिसरातील दोन ते तीन हजार शेतकरी अवलंबून आहेत. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोस्थान महाभियान अंतर्गत नगर पंचायत चाकूर येथील प्रस्तावित पाणीपुरवठा योजने करीता घरणी मध्यम प्रकल्प तालुका शिरूर अनंतपाळ येथून पाण्याचा मोठ्या प्रमाणात हक्क मागणीचा प्रस्ताव मा. जलसंपदा विभाग यांच्याकडे मा. कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजी नगर यांचेकडून मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता व तो मा. उपसचिव जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन यांनी मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्क मंजूर केलेला आहे. मात्र घरणी मध्यम प्रकल्पात निर्मितीपासून साठलेला गाळ, पाण्याची क्षमता, प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावांची संख्या, पाणीपुरवठा योजना, अवलंबून असलेले शेतीचे क्षेत्र, शिवपूर नऊ खेडी योजना व आटोळा सतरा खेडी योजना याचा कसल्याही प्रकारचा अभ्यास करण्यात आलेला नाही. वैयक्तिक स्वार्थापोटी केवळ चाकूर नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात हक्क मंजूर करून पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
सदरील पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्यास घरणी मध्यम प्रकल्पातील पाण्यावर अवलंबून असलेल्या नळेगांव, देवंग्रा, सुगाव, हिप्पळगाव, शिवपूर, शिरूर आनंतपाळ, लिंबाळवाडी व अनेक गावांना पाणीटंचाईच्या भीषण समस्येला सामोरे जावे लागणार आहे. तसेच या भागातील शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. या प्रकल्पावर तालुक्यातील सर्वात मोठे मत्स्यबीज उत्पादन केंद्र असून हजारो लोकांची उपजीविका या मत्स्य विक्री व्यवसायातून होते. घरणी मध्यम प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावांची अवस्था धरण उशाला कोरड घशाला अशी होईल. याबाबतीत सर्व नागरिकांच्या भावना अतिशय तीव्र असून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
आंदोलनावेळी अनिल चव्हाण, उमाकांत सावंत, शिवाजी बर्चे, दयानंद मानखेडे, राजेंद्र शेकार, घृणेश्वर मलशेट्टे, इश्वर पांडे, राजेंद्र सावंत, व्यंकट माचवे, संतोष तेलंगे, भुजंग अर्जुने, दत्तात्रय नरवाडे, सुनील भोसले, कृष्णा पांचाळ, बाळासाहेब बर्चे, नवनाथ मानखेडे आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments