Latest News

6/recent/ticker-posts

नीट परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी लातूर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

नीट परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी लातूर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

लातूर : जिल्ह्यात ४ मे २०२५ रोजी होणाऱ्या नीट-२०२५ परीक्षेसाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्ताची तयारी केली असून, परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कडेकोट उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ५१ परीक्षा केंद्रांवर एकाच वेळी दुपारी २ ते ५ या वेळेत ही परीक्षा होणार असून, सुमारे २०,८०१ विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. परीक्षेपूर्वी बायोमेट्रिक हजेरी आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांनी वेळेआधी केंद्रावर उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या परीक्षेसाठी ५ उपविभागीय पोलीस अधिकारी, ६० पोलीस अधिकारी, ३९१ पोलीस अंमलदार तसेच ३०० होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर एक पोलीस अधिकारी व पुरेशा प्रमाणात अमलदार नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी ४ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ७ या कालावधीत परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांसोबत येणाऱ्या पालकांनीही प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आणि कोणताही गैरप्रकार टाळण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments