दिव्यांग सक्षमीकरणासाठी स्वतंत्र विभागाची गरज होती – प्रादेशिक उपायुक्त देवसटवार
लातूर जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे उद्घाटन, दिव्यांगांच्या विकासाला मिळणार नवे बळ
लातूर : दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र विभागाची स्थापना ही काळाची गरज होती, असे प्रतिपादन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी केले. गूळ मार्केट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमात सहाय्यक संचालक (वित्त व लेखा) प्रभाकर डाके, समाज कल्याण अधिकारी विलास केंद्रे, जिल्हा जात पडताळणी अधिकारी राम वंगाटे, जिल्हा सक्षमीकरण अधिकारी राजू गायकवाड, सहाय्यक सल्लागार बाळासाहेब वाकडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रादेशिक उपायुक्त देवसटवार पुढे म्हणाले की, १९३२ मध्ये स्थापन झालेल्या दिव्यांग सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत समाजकल्याण विभाग कार्यरत होता. विविध योजनांची अंमलबजावणी त्यातून केली जात होती. आता स्वतंत्र दिव्यांग विभाग निर्माण झाल्याने या योजना अधिक प्रभावीपणे राबविता येतील. लातूर विभागातील चार जिल्ह्यांमध्ये दिव्यांगांसाठी १८० शाळा असून, सुमारे १०,००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अधिकाधिक दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे व त्यांना स्वावलंबी बनविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी संशोधन अधिकारी राम वंगाटे यांनीही मनोगत व्यक्त करत दिव्यांग सक्षमीकरणाची गरज अधोरेखित केली. प्रारंभी देवसटवार यांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा सक्षमीकरण अधिकारी राजू गायकवाड यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, स्वतंत्र दिव्यांग विभाग झाल्याने दिव्यांगांच्या समस्या अधिक वेगाने सोडविणे शक्य होणार आहे. शासनाच्या वतीने या विभागाला योग्य न्याय मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री गजानन बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सचिव अण्णासाहेब कदम, रामनारायण भुतडा, महेश पाळणे, विजय बुरांडे, हरिश्चंद्र बेंबडे, ज्ञानेश्वर राव, अमोल निलंगेकर, गणेश पाटील, बालाजी शिंदे यांच्यासह अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळांचे मुख्याध्यापक यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शिवाजी गायकवाड चिखलीकर यांनी केले तर आभार वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता तुकाराम धुमाळे यांनी मानले.
१०० दिवसांच्या कृतिराखड्यातून विभागाची स्थापना
राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कृतिराखड्याअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय स्थापन करण्यात आले. लातूर जिल्ह्यात हे कार्यालय १ मे महाराष्ट्र दिनी कार्यान्वित झाले असून, दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी ही मोठी पावले उचलण्यात आली आहेत.
0 Comments