शाळकरी मुलींचा पाठलाग करणाऱ्या दोन आरोपींना ६ महिन्यांचा कारावास व दंडाची शिक्षा – लातूर जिल्हा न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
लातूर : सन 2022 मध्ये मुरुड पोलीस ठाणे हद्दीत दोन अल्पवयीन मुली शाळा व ट्युशनसाठी ये-जा करत असताना त्यांचा सातत्याने पाठलाग करणाऱ्या दोघा आरोपींना लातूर येथील माननीय जिल्हा व सत्र न्यायालयाने सहा महिन्यांचा कारावास व प्रत्येकी ५,००० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी आरोपी अशोक शिवाजी अडसुळे (वय 31, रा. बोरगाव काळे, ता. लातूर) आणि बाळू उर्फ विजय भागवत लोहार (वय 34, रा. बोरगाव काळे, ता. लातूर) यांच्याविरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी व सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उजगरे यांच्या मार्गदर्शनाखाली बारकाईने करण्यात आला. तपासादरम्यान आवश्यक पुरावे गोळा करून आरोपींविरुद्ध भादंवि कलम 354(ड) अंतर्गत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवून सहा महिन्यांचा कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
या यशस्वी कारवाईत तपास अधिकारी, कोर्ट ट्रायल मॉनिटरिंग सेलचे पोलीस उपनिरीक्षक रोहन पाटील, कोर्ट पैरवी अमलदार इम्रान शेख, तसेच कोर्ट ड्युटी महिला पोलीस अंमलदार प्रेमला सगर यांचे महत्त्वाचे योगदान राहिले. ही कारवाई महिलांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची मानली जात असून अशा प्रकारच्या घटनांवर पोलिस यंत्रणेच्या सजगतेमुळे प्रभावी आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
0 Comments