लातूर जिल्ह्याचे नवे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे - ९ जून रोजी पदभार स्वीकारणार
लातूर : जिल्हा क्रीडा अधिकारीपदावर काही काळापासून बदलाची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर ३० मे रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांची पुणे येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी महादेव कसगावडे यांची लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कसगावडे हे येत्या ९ जून रोजी पदभार स्वीकारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जगन्नाथ लकडे यांनी आपल्या कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी केली. विशेषतः, उदगीर येथे पार पडलेल्या युवा महोत्सवातील नियोजनामुळे ते चर्चेत आले होते. याशिवाय, तालुकास्तरीय क्रीडा संकुलासाठी वाढीव निधीचे प्रस्ताव त्यांनी शासन दरबारी पाठवले होते. आता त्यांची पुणे जिल्ह्याच्या क्रीडा अधिकारीपदी बदली झाली आहे.
दरम्यान, सन २०१९ ते २०२२ या कालावधीत लातूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी राहिलेले महादेव कसगावडे पुन्हा या पदावर नियुक्त झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील त्यांच्या मागील तीन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या अनुभवी नेतृत्वामुळे लातूर जिल्ह्यातील रखडलेल्या विभागीय क्रीडा संकुलाचे काम मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
गेल्या तीन वर्षांपासून लातूरमधील विभागीय क्रीडा संकुलाचे काम विविध कारणांमुळे रखडले होते. कसगावडे यांच्या पुनर्नियुक्तीमुळे या प्रकल्पाला नवसंजीवनी मिळेल आणि जिल्ह्यातील खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास क्रीडाप्रेमी आणि लातूरकर व्यक्त करत आहेत.
0 Comments