जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून महादेव कसगावडे यांनी लातूरचा पदभार स्वीकारला; विविध क्रीडा संघटनांकडून उत्स्फूर्त स्वागत
लातूर : दि. ९ जून – शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत कार्यरत जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी नुकताच लातूर जिल्ह्याचा पदभार स्वीकारला असून, त्यांच्या स्वागतासाठी विविध क्रीडा संघटनांकडून आज (दि. ९ जून) उत्साहात स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला.
पुणे जिल्ह्यात जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून उत्कृष्ट कार्य केलेले महादेव कसगावडे यांची लातूर येथे बदली झाली असून, त्यांनी दिनांक ६ जून रोजी अधिकृतपणे लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा पदभार स्वीकारला. त्यांच्या पूर्वीच्या कार्यकाळातही त्यांनी लातूर जिल्ह्यात यशस्वीपणे काम पाहिले होते. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन, शासनाच्या क्रीडा योजनांचे प्रभावी अंमलबजावणी आणि खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे त्यांचे कार्य उल्लेखनीय राहिले आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर आज सकाळी ११ वाजता विविध क्रीडा संघटनांच्या वतीने त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकुशलतेबद्दल समाधान व्यक्त करत पुढील काळातही जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात व्यापक विकास घडवेल, असा विश्वास व्यक्त केला.
स्वागत समारंभावेळी लातूर जिल्हा व शहर ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशनचे सचिव के. वाय. पटवेकर, तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूरचे सचिव नेताजी जाधव पत्रकार लिंबराज पन्हाळकर, क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे, सुरेंद्र कराड, चंद्रकांत लोदगेकर, कैलास लटके, जयराज मुंडे, सारिका काळे, बावणे, दत्तात्रय गडपल्लेवार यांच्यासह जिल्हा क्रीडा कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महादेव कसगावडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, "लातूर जिल्ह्यातील खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या क्रीडा धोरणांची अंमलबजावणी प्राधान्याने केली जाईल. खेळातूनच युवा शक्ती घडते यावर माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून अधिकाधिक खेळाडू तयार व्हावेत, यासाठी मी प्रयत्नशील राहीन.
0 Comments