Latest News

6/recent/ticker-posts

98 हजारांचा ऐवज असलेली पर्स ऑटोत विसरली; स्वामी विवेकानंद पोलिसांच्या सतर्कतेमुळे मूळ मालकास परत

98 हजारांचा ऐवज असलेली पर्स ऑटोत विसरली; स्वामी विवेकानंद पोलिसांच्या सतर्कतेमुळे मूळ मालकास परत


लातूर : दि. 12 जुलै - लातूरहून अहमदपूरला जाणाऱ्या ऑटोरिक्षामध्ये प्रवास करणाऱ्या महिलेची 98 हजार रुपये किमतीची पर्स विसरली गेली होती. मात्र स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याच्या तत्परतेमुळे सदरील ऐवज मूळ मालकाकडे सुखरूप परत करण्यात आला आहे. रमाबाई विश्वनाथ वाघमारे या महिला स्वामी विवेकानंद चौक, लातूर येथून अहमदपूरकडे जाणाऱ्या ऑटोरिक्षाने प्रवास करत होत्या. अहमदपूर येथे उतरल्यानंतर त्यांना त्यांच्या पर्सचा विसर पडल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याशी संपर्क साधून ही माहिती दिली.

पोलिसांनी तात्काळ हालचाल करत सीएनजी पंपावरून संबंधित ऑटोरिक्षाचा व चालकाचा तपशील मिळवला. चालक महादेव गणपती कांबळे याच्याशी संपर्क साधल्यावर पर्स ऑटोत असल्याची पुष्टी झाली. त्यानुसार, दिनांक 12 जुलै रोजी त्यांनी पर्स स्वामी विवेकानंद पोलीस ठाणे, लातूर येथे आणून दिली. सदर पर्समध्ये अंदाजे 98 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण आणि काही महत्त्वाची कागदपत्रे होती. ही घटना दिनांक 9 जुलै रोजी घडली होती. स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब चव्हाण, पोलीस अंमलदार रवी कांबळे, संजय बेरळीकर व आनंद हल्लाळे यांच्या कार्यक्षमतेचे आणि तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या सतर्कतेमुळे एक महत्त्वाचा ऐवज मूळ मालकास परत मिळाला.

Post a Comment

0 Comments