तीस वर्षांपासून फरार असलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
लातूर : दि. २ जुलै देवणी पोलीस ठाणे हद्दीतील १९९४ साली दाखल झालेल्या महाराष्ट्र कॉटन ॲक्ट गुन्ह्यातील आरोपी तब्बल तीस वर्षांपासून फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत शिताफीने कारवाई करत या फरार आरोपीला अटक केली आहे.
यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी गोविंद तुकाराम राठोड (वय ५९, रा. ढोबळेवाडी, ता. गंगाखेड, जि. परभणी) याच्याविरुद्ध १९९४ साली देवणी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र कॉटन ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो सतत आपले राहण्याचे ठिकाण व ओळख लपवत असल्यामुळे पोलीसांच्या हाताला लागत नव्हता.
लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी जिल्ह्यातील जुन्या व फरार गुन्हेगारांचा आढावा घेत त्यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कामाला सुरुवात केली.
पथकातील पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे आरोपी गोविंद तुकाराम राठोड याला दिनांक ०१ जुलै २०२५ रोजी लातूर येथील नवीन रेनापूर नाका परिसरातून ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी देवणी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अंमलदार विनोद चलवाड, राजेश कंचे, सूर्यकांत कलमे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
0 Comments