निमा संघटनेच्या अकलूज शाखेचे कार्य कौतुकास्पद – डॉ. प्रताप सोमवंशी
माळशिरस : नॅशनल इंटीग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) या देशपातळीवरील बीएएमएस डॉक्टरांच्या सर्वात मोठ्या संघटनेच्या केंद्रीय समितीत माळशिरस तालुक्यातील तीन डॉक्टरांची निवड होणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. या निमित्त निमा अकलूज (ता. माळशिरस) शाखेच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. तानाजी कदम, डॉ. मिलिंद गुळभीले व डॉ. सुधीर पोफळे यांची केंद्रीय सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. अंजली कदम यांची निमा वुमन फोरमच्या विभागीय सचिवपदी निवड झाली आहे.
या समारंभासाठी निमा संघटनेचे केंद्रीय प्रवक्ते डॉ. प्रताप सोमवंशी, तसेच डॉ. सुधीर काटे, डॉ. अमृत पेरणे व डॉ. वैभव लाडे हे केंद्रीय सदस्य विशेष उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. प्रताप सोमवंशी यांनी निमा संघटनेच्या कार्यपद्धतीबाबत, सदस्यांसाठी राबवता येणाऱ्या योजना, एमबीएस मेंबरशिपचे महत्त्व व वाढीव सदस्य नोंदणीसाठीच्या उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. तसेच "आरोग्य संजीवन कार्ड" ही योजना प्रत्येक निमा डॉक्टरपर्यंत पोहोचली पाहिजे व ती त्यांच्या कुटुंबीयांसाठी उपयुक्त ठरावी, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. पिंपरी-चिंचवड शाखेचे कार्य हे आदर्शवत असल्याचा गौरव त्यांनी अभिमानाने केला.
कार्यक्रमास माळशिरस तालुक्यातील डॉक्टरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अमोल माने (अध्यक्ष, निमा माळशिरस) यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रशांत निंबाळकर यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. शबाना शेख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपाध्यक्ष डॉ. हर्षवर्धन गायकवाड, सचिव डॉ. दादासाहेब पराडे, डॉ. उदयसिंह माने देशमुख व डॉ. शिरीष रननवरे यांनी विशेष मेहनत घेतली.
0 Comments