रेणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
लातूर : रेणा नदीवरील रेणापूर, जवळगा, बंधारा येथील पाणीपातळी पूर्ण संचय पातळीवर पोहोचली आहे. सध्या बंधाऱ्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू असून, नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी आणि वस्त्यांमध्ये राहणाऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीपात्रात जाणे टाळावे, तसेच आपल्या मालमत्तेची आणि जनावरांची विशेष काळजी घ्यावी. दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्त्रोताजवळ अथवा विद्युत खांबाजवळ बांधू नयेत. जनावरांना सुरक्षित स्थळी बांधावे व स्थलांतरित करावे. नागरिकांनी स्वतःही सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.
जलसाठ्याजवळ किंवा नदीकाठावर जाणे टाळावे. मुलांना जलसाठ्यावर किंवा नदीत पोहण्यासाठी पाठवू नये. शाळा-महाविद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या बाबतीत सूचना द्याव्यात. पुलावर किंवा नाल्यावरून पाणी वाहत असताना कोणीही स्वतः किंवा वाहनासह पूल, नाला ओलांडू नये. पूर प्रवण भागात जाण्याचे टाळावे. पावसाच्या काळात विद्युत तारा, जुनी इमारती कोसळण्याची शक्यता असल्याने त्यापासून दूर राहावे. लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना सतर्क राहण्याचे व सर्व आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
0 Comments