विशेष...
लातूर जिल्हा रूग्णालय निर्मितीला वेग, महिन्याभरात होणार भूमिपूजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मंजूरी, पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची हमी
गत १६ वर्षांपासून रखडलेल्या लातूर जिल्हा रूग्णालय या बहुप्रतिक्षित आस्थापनेच्या निर्मितीला वेग आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा रूग्णालय निर्मितीला मंजुरी देत असल्याची घोषणा केली तर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी येत्या महिन्याभरात किंवा त्यापूर्वीच लातूरच्या प्रस्तावित जिल्हा रुग्णालय इमारतीचे भूमिपजन केले जाईल अशी हमी १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित शासकीय धजारोहण कार्यक्रमानंतर पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. लातूर जिल्हा रुग्णालयाचा इतिहास मोठा रंजक आणि चकीत करणारा आहे. अस्तित्वात असलेली जिल्हा रूग्णालयाची इमारत १ ऑक्टबर २००८ साली उपलब्ध असलेल्या मनुष्यबळासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास वर्ग करण्यात आली. येत्या ३ ते ४ वर्षात जिल्हा रुग्णालयासाठी जागा शोधून नवीन जिल्हा रूग्णालय होणे गरजेचे होते त्या अनुषंगाने २०१२ साली राज्य सरकारने जिल्हा रूग्णालयास मान्यता देऊन बांधकामासाठी १२० कोटी रुपयांची तरतूद देखील केली होती. मात्र दुर्दैव यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात राज्यकर्ते, प्रशासन अपयशी ठरले. तब्बल ७ वर्षानंतर म्हणजेच १९ जुलै २०१९ रोजी तत्कालीन राज्य शासनाने जिल्हा रुग्णालयासाठी परभणी कृषी विद्यापीठ अंतर्गत लातूर कृषी महाविद्यालय येथील सर्वे क्रमांक ३७ मधील १० एकर जागा विशेष बाब म्हणून मंजूर केली आणि या जागेच्या हस्तांतरण पोटी आरोग्य विभागाने २ कोटी ८२ लाख रुपये कृषी विभागास मोबदला द्यावा असा शासन आदेश काढला. त्यानंतर आलेल्या कोरोना संकटात हा आदेश ५ वर्ष लालफितीत अडकून राहिला. ना शासनाने, प्रशासनाने, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिले हे दुर्देवाने सांगितले पाहिजे. कोरोनासारख्या संकटात जिल्हा रुग्णालयाची कमतरता लातूर जिल्ह्याला प्रकर्षाने जाणवली. जिल्हा रूग्णालय असते तर जिल्ह्यातील अनेक गोरगरीब रुग्णांचे प्राण वाचले असते या विचाराने पुन्हा एकदा या मागणीने जोर धरला. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या "माझं लातूर परिवाराने" यासाठीचा लढा उभारला. २ ऑक्टोबर २०२३ पासून लातूर शहरातील गांधी चौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बेमुदत साखळी उपोषणाने हा बहुचर्चित आणि प्रलंबित विषय पुन्हा ऐरणीवर आला. ही मागणी रास्त असल्याची भूमिका घेत आमदार संभाजी पाटील निलंगेकर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख, आमदार अभिमन्यू पवार, माजी खासदार डॉ सुनिल गायकवाड, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर, माजी महापौर दीपक सुळ, विक्रांत गोजमगुंडे, काँग्रेसचे ॲड किरण जाधव, मोईज शेख, राष्ट्रवादीचे राजा मणियार, मकरंद सावे, शिवसेनेचे ॲड बळवंत जाधव यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटनां आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मागणीला जाहीर पाठिंबा दिला होता.
एवढ्यावर न थांबता माझं लातूर परिवाराच्या शिष्टमंडळाने मंत्रालय गाठून तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, आरोग्यमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून निवेदने दिली आणि हा प्रलंबित विषय तात्काळ मार्गी लावावा अशी आग्रही मागणी केली. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांना भेटून पुढाकार घ्यावा असे आवाहन केले होते. या निरंतर पाठपुराव्याला अखेर १९ जून २०२४ रोजी यश मिळाले आणि ६० दिवसांच्या आत नियोजित जागा आरोग्य विभागाने ताब्यात घ्यावी असा शासन आदेश काढला. पण यावेळीही अनेक तांत्रिक अडचणी समोर आल्या. १९ जुलै २०१९ सालीचे जागेचे मूल्यांकन २ कोटी ८२ लाख होते पण आता २०२४ प्रमाणे मूल्यांकन आवश्यक होते याचाही पाठपुरावा करून जागेचे पुनर्मूल्यांकन करण्यात आले आणि आता या जागेचे ३ कोटी ६८ हजार ६५० असे मूल्यांकन जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आणि तसा प्रस्तावही जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविला. निधीच उपलब्ध नाही या सबबीखाली हा विषय पुन्हा लालफितीत अडकून राहिला. यासाठी नव्याने पाठपुरावा सुरू झाला नूतन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या महत्वपूर्ण विषयाचे गांभीर्य लक्षात घेत यासाठी पुढाकार घेतला आणि अर्थसंकल्पात या निधीची तरतूद होईल याची दक्षता घेतली. अखेर १४ मे २०२५ रोजी आरोग्य विभागाने ३ कोटी ३२ लाख ६५० रुपये हस्तांतरण निधी कृषी विभागास वर्ग केला आणि २२ मे २०२५ रोजी ही जागा आरोग्य विभागाच्या ताब्यात आली. स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरणानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ११ ऑगस्ट २०२५ रोजी प्रथमच लातूरात आले यावेळी आयोजित कार्यक्रमात लातूर जिल्हा निर्मितीला आजच मान्यता देत असल्याची जाहीर घोषणा केली. त्यानंतर १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री भोसले यांनी एका महिन्याच्या आत नियोजित जिल्हा रूग्णालय इमारतीचे भूमिपजन सर्वांना सोबत घेऊन केले जाईल अशी हमी पत्रकारांना बोलताना दिली. एकंदरीत गेल्या २ महिन्यापासून शासकीय, प्रशासकीय स्तरावर या विषयाला मिळालेली गती आणि हालचाली पाहता लातूरकरांचे जिल्हा रूग्णालयाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होईल यात शंका राहिली नाही. या बहुप्रतिक्षित आणि बहुप्रलंबित विषयासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वस्तरातील मान्यवरांचे माझं लातूर परिवाराने आभार मानले आहेत. एखाद्या सामाजिक विषयासाठी निःस्वार्थ भावनेने, सनदशीर मार्गाने, निरंतर लढा दिल्यास त्यास येणारे यश हे खूप महत्त्वाचे ठरते हे या जिल्हा रूग्णालय लढ्याने दाखवून दिले आहे.
सतीश तांदळे
अतिथी संपादक
मराठी अस्मितेचा इशारा
0 Comments