बंध सुरक्षिततेचा अभ्यास: संजीवनी महाविद्यालयात स्वरक्षण कार्यशाळा व राखी मेकिंग स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली
चाकूर : तालुक्याच्या चापोली येथील संजीवनी महाविद्यालयाने महिला सक्षमीकरण कक्षाच्या वतीने मंगळवारी (ता. ५) “बंध सुरक्षिततेचा” या महत्त्वाच्या संकल्पनेवर स्वरक्षण कार्यशाळा व राखी मेकिंग स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. सांस्कृतिक परंपरा आणि वैयक्तिक सुरक्षिततेला जोडणारा हा उपक्रम प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी अनमोल अनुभव ठरला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. धनंजय नारायणराव चाटे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक युसुफ शेख व त्यांची प्रशिक्षित टीम, सौ. पी. एन. मुंडे, सौ. सज्जन आदी मान्यवरांनी कार्यक्रमाचा गौरव केला. शिक्षणमहर्षी कर्मयोगी डॉ. नारायणराव चाटें यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. प्रा. डॉ. एस. ए. बनसोडे यांनी सादर केलेल्या सुरेल स्वागतगीतामुळे कार्यक्रमाची सुरुवात प्रेरणादायी आणि आनंददायी झाली.
राखी मेकिंग स्पर्धेत संजीवनी महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सहभागी विद्यार्थ्यांनी जुन्या साड्यांवरील मोती, टिकल्या, कुंदन, घरगुती रेशीम पेपर, मोरपंख, नैसर्गिक फुले यांसारख्या वस्तूंचा पुनर्वापर करून सुंदर राख्या तयार केल्या. या स्पर्धेत प्राची चामले प्रथम, मोनिका सोमासे द्वितीय आणि गौरी निटूरे तृतीय क्रमांकावर ठरल्या. विजेत्या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. धनंजय चाटे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र दिले गेले.
राखी मेकिंग स्पर्धेनंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात कराटे प्रशिक्षक युसुफ शेख व त्यांची टीम यांनी मुलींना आपत्कालीन परिस्थितीत स्वरक्षण कसे करावे याचे कौशल्य प्रात्यक्षिकाद्वारे सांगितले, ज्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. बी. बी. कांबळे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. एस. पी. चव्हाण यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. सौ. एस. पी. जाधव यांनी केले. महिला सक्षमीकरण कक्षाच्या समन्वयक प्रा. प्रीती खरात, प्रा. डॉ. मंदाकिनी थोरात, प्रा. तुकाराम मुंढे, प्रा. धनंजय टिगोटे व प्रा. डॉ. राहुल आपटे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अथक परिश्रम घेतले. संजीवनी महाविद्यालयातील हा “बंध सुरक्षिततेचा” उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून त्यांच्या आत्मसन्मान व सुरक्षिततेला चालना देणारा ठरला आहे.
0 Comments