सतीश तांदळे{ मुक्त पत्रकार } यांच्या लेखणीतून....
अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि आता प्रचंड युनिपोलचा भार लातूरकरांना असह्य...
लातूर शहरातील बेशिस्त वाहतूक, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक, वाढते अवैध अतिक्रमण या कारणांमुळे मुख्य रस्त्यांवर होत असलेली सततची वाहतूक कोंडी लातूरकरांना असह्य होत असतानाच आता प्रचंड आणि धोकादायक युनिपोलचा भार लातूरकरांची चिंता वाढविणारा आहे. खरंच लातूर शहराला "युनिपोल" ची गरज आहे का? याबाबत मनपा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा अशी विनंती माझं लातूर परिवाराने केली आहे. लातूर शहरातील वाढते अतिक्रमण, बेशिस्त वाहतूक, वाहतूक नियमांचे पालन न करणारे वाहनचालक याचे फलित म्हणजे चौका-चौकात होत असलेली वाहतूक कोंडी. यामुळे लातूरकर त्रस्त झालेले असतानाच आता शहरात मुख्य ठिकाणी रस्त्याच्या मधोमध उभे होत असलेले प्रचंड आणि धोकादायक युनिपोल नागरिकांची चिंता वाढविणारी ठरत आहेत. खासगी इमारतीवरील बेकायदा होर्डिंग्ज, जाहिराती फलक, फ्लेक्सच्या विळख्यातून मुक्त होण्यासाठी धडपडणारे लातूर शहर आता युनिपोलच्या नव्या आणि धोकादायक संकटाला सामोरे जात आहे.
खरंच लातूर शहराला युनिपोलची गरज आहे का? याचा जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने गंभीर विचार करावा असा सूर आता सर्वसामान्य नागरिकांतून निघत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून वादळी वारे, मोठा पाऊस झाला तर हे युनिपोल नागरिकांच्या जीवावर बेतू शकतात. एखादी दुर्घटना होण्याआधी ती दुर्घटना होणारच नाही यासाठी प्रशासनाने उपाययोजना आखणे अपेक्षित आहे. युनिपोलच्या माध्यमातून लाखों रुपयांचा कर जरी मनपाला मिळणार असला तरी नागरिकांची संभाव्य जीवित आणि वित्तहानी मनपाला न परवडणारी आहे हे लक्षात घेतले पाहिजे. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि मनपा प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवित शहरातील अवैध अतिक्रमण, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी त्वरीत पाऊले उचलण्याची गरज असून धोकादायक युनिपोलचे संभाव्य धोके पाहता हे युनिपोल तात्काळ हटविण्यात यावेत अशी विनंती माझं लातूर परिवाराच्या वतीने मनपा प्रशासनास करण्यात येत आहे.
सतीश तांदळे{ मुक्त पत्रकार }
माझं लातूर परिवार
0 Comments