शेतकरी कर्जमाफी व मराठा आरक्षणासाठी लातूरमध्ये संभाजी ब्रिगेडचे लक्षवेधी आंदोलन
लातूर : शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्यावी आणि मराठा आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी, या मागण्यांसाठी गुरुवारी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडतर्फे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम आणि राजकुमार माने यांनी केले.
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, मराठा आणि इतर समाजबांधवांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा, दुधाला प्रति लिटर ७० रुपये भाव द्यावा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 'एफ.आर.पी.' प्रमाणे सात दिवसांत रक्कम अदा करावी, साखर कारखान्यांवर पारदर्शक व दोषविरहित वजनकाटे बंधनकारक करावेत, अतिवृष्टीग्रस्त भागांना दुष्काळग्रस्त घोषित करून हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, तसेच ईव्हीएम बंद करून देशातील निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
आंदोलनात जिल्हा सचिव इर्शाद शेख, महानगराध्यक्ष गजानन जाधव, उद्योजक कक्ष जिल्हाध्यक्ष मिथुन दिवे, बळवंत चिंचोलकर, उत्तम फड, रमेश लाबोटे, जावेद मुजावर, सलीम पठाण, सिद्धेश्वर तेलंगे, जिल्हा संघटक मेहबूब सय्यद, मोहनेश्वर विश्वकर्मा, राजकुमार भालेराव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments